नागपूर : नाग नदीत पावणेदोन महिन्यापूर्वी मगर दिसली होती. पण, ती आहे की, नाही. यावरून संशय येत होता. काहींनी तर मगर असल्याचे व्हिडीओ व्हायरल केले होते. त्यामुळं ही नदीतच आहे. यावर एकमत झाले. नंतर सुरू झाला या मगरीला पकडण्याची मोहीम.
ही मगर कुठून आली, यावरून चर्चा सुरू झाली. महाराजबागेत असलेल्या मगरीची पिल्ले पुरात वाहून गेली होती. त्यापैकी काही पिल्ले मरण पावली. एक-दोन मगरीची पिल्ले गायब झाली होती. तीच ही मगर असावी, असा अंदाज आहे. पण, नाग नदीत मगर कशी जीवंत राहील, असा संशय व्यक्त केला जात होता. एवढ्या खराब पाण्यात मगर जीवंतच राहणार नाही, असंच बहुतेकांना वाटत होते. तरीही मध्यंतरी ती कुणालातरी दिसायची. नंतर गायब व्हायची. हा लपंडाव सु्रू होता. मगरीला पाहण्यासाठी मध्यंतरी बरीच गर्दी राहायची.
वनविभागानं पुढाकार घेऊन पिंजरे टाकले. त्यातही ती अडकली नाही. शेवटी कोल्हापूरचे टीमला पाचारण करण्यात आले. एक जानेवारीला कोल्हापूरच्या वनविभागाचे विशेष पथक या मगरीला पकडण्यासाठी आले. या पथकानं लावलेल्या दोन पिंजऱ्यांमध्ये कोंबडी ठेवली होती. ती कोंबडी खाण्यासाठी शनिवारी रात्री तीन वाजता मगर आली. तेव्ही ती अलगत जाळ्यात अडकली.
आज सकाळी तिला पकडून सेमिनरी हिल्सवरील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरला पाठविण्यात आले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तसेच कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.