नागपूर : संविधान चौकात काल स्टार बस जळाली. त्यापूर्वी मेडिकल चौकात स्टार बस जळाली. यामागची काय कारण आहेत, याचा शोध घेतला असता. नागपूर स्टार बसच्या सेवेत 167 अनफीट बस असल्याची गंभीर बाब समोर आली. त्यामुळं स्टार बसमधून प्रवास करत असाल तर सावध व्हा, कारण या बस केव्हा पेट घेतील काही सांगता येत नाही. नागपुरात यंदाच्या उन्हाळ्यात चार स्टार बस जळाल्या. अचानक बस जळाल्याने प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय. त्यामुळे आता नागपूर महानगरपालिका (Municipal Administration) अनफीट बसेस का चालवतात? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय. नागपुरात भंगारात जाण्याच्या स्थितीत असलेल्या, तब्बल 167 बस सध्या नागपुरात धावत आहेत. अनफीट बसमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. अनफीट बसचा ठराव घेऊनही मनपा प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहेत, असा धक्कादायक खुलासा मनपाचे तत्कालीन परिवहन सभापती (Transport Chairman) बंटी कुकडे (Bunty Kukde) यांनी केलाय.
आउटडेटेड होऊनही मनपा परिवहन विभागाकडून बस चालविण्यात येतात. आरटीओच्या नियमानुसार, आउटडेटेड बस चालविल्या जात असल्यानं यंदा चार बस पेटल्यात. ज्या बस मिळाल्या होत्या त्यांना आरटीओ नियमानुसार दहा वर्षे पूर्ण झाली होती. त्या बस कंडममध्ये टाकून नवीन बस खरेदी करण्याचा ठराव एक जानेवारीला घेण्यात आला होता. तशाप्रकारचे निर्देश परिहवन समितीनं मनपाला दिले होते.
167 बसचा कालावधी संपलेला आहे. या बस रस्त्यावर चालविण्यायोग्य नाहीत. पण, महापालिकेत सध्या प्रशासक आहेत. त्यांनी याबाबत कोणतीही आपुलकी दाखविली नाही. त्यामुळं नागपूरकरांचा जीव धोक्यात आला आहे, असा खुलासा परिवहन समितीचे माजी सभापती बंटी कुकडे यांनी केलाय. केंद्राकडून 115 बस नवीन देण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा काढून त्या सेवेत हजर करायच्या आहेत. शिवाय स्मार्ट सिटीने 15 एसी बस नागपूरला दिल्या आहेत. त्याच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. पण, अद्याप त्या बस शहरातील रस्त्यावर धावत नाहीत.
नागपुरातील स्टार बस म्हणजेच आपली बस सेवेतील 32 बसची योग्यता तपासणीच झाली नाही. तरीही या धोकादायक बसेसमधून नागपूरकरांचा प्रवास सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात अशाच चार बसला आग लागलीय. भविष्यात काही अघटीत घडण्यापूर्वी महापालिका आणि आरटीओ हे प्रकरण गांभीर्याने घेणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय. आपली बसच्या ताफ्यात सध्या 447 बस आहेत. यापैकी 415 बसेसची RTO कडून योग्यता तपासणी झाली. पण 32 बस योग्यता तपासणीविना धावत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने तीन दिवसांपूर्वीच महापालिकेच्या परिवहन विभागाला योग्यता तपासणी तातडीने करावी, यासाठी पत्र दिलेय. पण मनपाला जाग आली नाही, अशी माहिती नागपूरचे आरटीओ रवींद्र भुयार यांनी दिली.