नागपूर : शिक्षक भारतीचे विदर्भातील नेते प्रा. दिलीप तडस (Dilip Tadas) यांचे काल रात्री निधन झाले. हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने त्यांनी वयाच्या 54 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. शिक्षकांच्या हक्कासाठी संघर्ष करणारा शिक्षक हरपला असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. नागपुरातील विदर्भ बुनियादी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सक्करदरा येथे ते उपप्राचार्य होते. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी हानी झाली आहे. कर्ता शिक्षक गेल्यानं त्यांची कमतरता जाणवणार आहे. प्रा. दिलीप तडस हे 2007 पासून शिक्षक भारतीशी जुळले. नागपूर विभागातील कार्यवाह होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आमदार कपिल पाटील (MLA Kapil Patil ) यांनी महाराष्ट्र राज्याचे संयुक्त कार्यवाह म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली. ती जबाबादारी त्यांनी इमाने इतबारे पार पाडली. म्हणूनच शिक्षक भारती (Shikshak Bharti) ही संघटना मजबुत झाली.
प्रा. दिलीप तडस हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील घोरार येथील. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेलु, घोरार येथे झाले. यशवंत महाविद्यालयामध्ये ते स्नातक झाले. वडील हे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी आपल्या मुलावर मौलिक संस्कार केले. तिथून ते नागपूर विद्यापीठ परिसर येथील मराठी विभागामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आले. प्रा. दिलीप हे मराठी विषयाचे गाढे अभ्यासक होते. उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांनी ख्याती होती. विदर्भ बुनियादी कनिष्ठ महाविद्यालयात भाषा विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. सोबतच सिरसपेठ येथील नरेंद्र नाईट स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे त्यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण पुरविण्याचं काम केलं. हे महत्कार्य करत असताना शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांनी शिक्षक भारती संघटनेची बिजे नागपूर विभागात रोवली.
शिक्षक भारतीचा विचार प्रा. दिलीप तडस शहरापासून खेडेगावापर्यंत पोहचविला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या सन्मानासाठी नागपूर विभागात अनेक लढाया यशस्वीपणे लढल्या. शिक्षकांच्या समस्यांना न्याय देण्याचं काम ते करत होते. त्यांच्याकडे गेलेल्या शिक्षकांसाठी झटत होते. त्यामुळं ते शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. विविध सामाजिक कार्यातही ते सक्रिय राहायचे. विदर्भ माध्यमिक मराठी संघाचे ते समन्वयक होते. लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाचे संचालनही त्यांनी केलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, कवी, नाटककार यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला होता.