नागपूर : शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारी महाबनी डॉट इन वेबसाईट ही बेनिफिट फ्रॉम होम क्रांतीची सुरुवात आहे. तुमच्या घटनात्मक हक्काला घरबसल्या न्याय देतानाच शासन गतिशील, पारदर्शी आणि आणखी जबाबदार करणारी ही प्रक्रिया आहे. सामान्यातल्या सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची हमी घेणाऱ्या या वेबसाईटचे (संकेतस्थळाचे) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंती दिनाला लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथील एका शानदार सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचा शुभारंभ झाला. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाबनी डॉट इन या वेबसाईटची (website) सुरुवात त्यांच्या हस्ते करण्यात आली.
नागपूर जिल्हा प्रशासनाने पिक्सल स्टार्ट संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने सुरू केलेली ही वेबसाईट एका क्लिकवर सर्व शासकीय योजनांचा लाभ देणार आहे. या वेबसाईटचे कामकाज आजपासून सुरू झाले आहे. या वेबसाईटचे लोकार्पण करताना ते बोलत होते. 15 दिवसाच्या आत लाभार्थ्यांनी दिलेल्या अर्जावर कारवाईची अपेक्षा यामध्ये करण्यात आली आहे. हे काम पंधरा दिवसात झाले नाही तर याठिकाणी दप्तर दिरंगाई होत आहे हे लक्षात येईल. ही माहिती जिल्हाधिकारी व त्यांच्या मार्फत संबंधितांच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे विशिष्ट कालमर्यादेत प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळावा यासाठीची ही तांत्रिक बांधणी आहे.
कुणाल राऊत या माझ्या मुलाने अशा परिस्थितीतही शासन गतिशील राहू शकते. लाभार्थ्यांना देखील घरबसल्या त्यांचा नियमित लाभ मिळू शकतो. हे तांत्रिकदृष्ट्या आपल्याला पटवून सांगितले. त्यानंतर वर्षभर एक टिमच यासाठी कार्यरत आहे. आज प्रत्यक्षात सामान्य नागरिकांसाठी ही योजना कार्यरत होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे खेड्याकडे चला. ग्रामीण भागातील नागरिकांना तत्परतेने न्याय मिळावा. यासाठी ही योजना आणखी कामी येईल. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात याव्यात. तसेच तरुणांना अधिकाधिक या माध्यमातून न्याय मिळावा, अशी अपेक्षाही डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी राज्य शासनाच्या काय काम ? असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होऊ शकतो. मात्र, ही वेबसाइट इतरांपेक्षा वेगळी आहे. कारण याठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करता येतो. दाखल केलेला अर्ज प्रशासनाला माहिती पडतो. या अर्जावर कोणतीही कारवाई झाली अथवा नाही याची माहिती प्रशासनाला मिळते. पंधरा दिवसांत संबंधित विभागाला ती कारवाई पूर्ण करण्याचे बंधन याठिकाणी घालण्यात आले आहे. सोबतच तुम्ही केलेल्या अर्जाचा मेसेज सुद्धा आपल्याला मोबाइलला येतो. त्यामुळे गतिशीलता, पारदर्शिता आणि जबाबदारी सगळ्याच बाबतीत ही वेबसाईट उजवी ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.