नागपूर : बॅचलर इन स्पोर्टस (Bachelor in Sports), सायन्स, बॅचलर इन स्पोर्टस मॅनेजमेंट व मास्टर इन स्पोर्टस सायन्स आणि मास्टर इन स्पोर्टस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांना केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. तसेच आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission) सदर अभ्यासक्रमांना मान्यतेबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे. अशी माहिती माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. केदार म्हणाले, देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले आहे. क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर या पदव्यांच्या अभ्यासक्रमास विद्यापीठ अनुदान मंडळाने (सुजीसी) मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात या विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम देशात प्रथमच महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात (International Sports University) सुरू होत आहे.
राज्यात गेल्या दीड वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची घोषणा झाली. त्याचवेळी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार होते. परंतु, कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होता. आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे होते. त्यामुळं अभ्यासक्रम सुरू करता आला नाही. आता हळूहळू कोरोना प्रादुर्भाव कमी कमी होत आहे. विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु करण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले. भारतातील तरुणांसाठी मान्यताप्राप्त पदवीला पर्याय म्हणून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन या विषयामध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स या पदव्याचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान मंडळाने (यूजीसी) घेतला असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात वसलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात पहिल्या टप्प्यात 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी, क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील तीन वर्षांचा अभ्यासक्रम, तसेच क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्यात आला आहे. या संस्थेने क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन व क्रीडा व्यवस्थापन यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये आयआयटी आणि आयआयएम या संस्थांचे देखील सहकार्य मागितले आहे. जेणेकरून एकत्रित आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करता येईल, असे केदार यांनी सांगितले.