नागपूर: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना शिवसेनेने (shivsena) उमेदवारी नाकारल्यानंतर भाजप (bjp) काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. फडणवीस यांनी संभाजी छत्रपतींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पण भाजपची भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संभाजी राजे यांच्या उमेदवारी बाबात ज्या प्रकारे शरद पवारांनी हा विषय सुरु केला. आणि त्यानंतर हा विषय वेगळ्या दिशेनं गेला. कदाचित संभाजी राजे यांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न असावा. पण हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यावर मी बेलण्याचं कारण नाही, अशी सावध प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस हे नागपुरात मीडियाशी संवाद साधत होते. शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांना ईडीची नोटीस आली. त्यावर मात्र त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. याविषयी मला माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सवाल केला. पेट्रोल, डिझेलवर राज्याचा कर 29 रुपये आणि केंद्राचा कर 19 रुपये आहे. राज्याचा कर का कमी करत नाही? आधी शरद पवार यांनी यावर बोलावं, असं सांगतानाच महागाई वाढवण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहेत. 29 रुपये कर पेट्रोल, डिझेलवर लावून हे लोक महागाईवर बोलू कसे शकतात? याचं मला आश्चर्य वाटतंय, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, भाजपने राज्यसभेसाठी कुणाला पाठिंबा द्यायचा याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे संभाजीराजेंना पाठिंबा देण्याविषयी विधान करतील असं वाटत होतं. पण फडणवीसांनी त्यावर भाष्य केलं नाही. उलट राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर ठपका ठेवला. मात्र, असं असलं तरी फडणवीस संभाजीराजेंना पाठिंबा जाहीर करतात की उमेदवार देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, संभाजी छत्रपती आज मराठा संघटनांशी चर्चा करणार आहे. या बैठकीत निवडणुकीच्या गणितावर चर्चा केली जाईल. भाजपने अजूनही संभाजीराजेंना पाठिंबा दिला नाही. त्यावर चर्चा केली जाईल. तसेच भाजपने पाठिंबा दिल्यानंतर विजयाचं गणित काय आहे त्यावरही चर्चा होईल. त्यानंतर निवडणुकीच्या मैदानात राहायचं की माघार घ्यायची या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर संभाजी छत्रपती मीडियाशी संवाद साधण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.