नागपूर : भाजप नेते मोहित कंबोज (BJP leader Mohit Kamboj) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी (Shiv Sainik) काल हल्ला केला. मोहित कंबोज यांची गाडी मातोश्रीसमोरून जात असताना शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) म्हणाले, राणांवरील हल्ला हा पोलिसांच्या भरोशावर केला गेलेला हल्ला आहे. सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्यांवर अशाप्रकारे हल्ले केले जातात. पण, आम्ही अशा हल्ल्यांना घाबरणार नाही.
सध्या सरकारमध्ये सरकारच्या भ्रष्टाचाराच्या कुणी बोललं तर त्याला जीवे मारून टाकू अशा प्रकारची प्रवृत्ती दिसते. अशा धमकीला पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्येही घाबरलो नाही. इथंही घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. अशाप्रकारचे कितीतरी हल्ले केले. हे सरकारच्या भरवशावर हल्ले आहेत. 200-300 लोकांनी एखाद्यावर हल्ले करणे, हे पोलिसांच्या भरवशावर हल्ले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. अशा प्रकारे हल्ले झाल्यामुळे आमचं तोंड बंद होणार नाही. सरकारचा भ्रष्टाचार आम्ही काढत राहू, असंही फडणवीस म्हणाले.
मोहित कंबोज यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या मदतीसाठी कंबोज आले असावेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मोहित रेकी करायला आले होते, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यावर अतुल भातखळकर म्हणाले, कंबोज रेकी करायला आले होते, तेव्हा पोलीस झोपले होते का? मोहित कंबोज यांच्यावरील हल्ल्यानंतर भाजपकडून शिवसेनेचा चांगलाच समाचार घेण्यात आला.