नागपूर: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये या मुद्द्यावरून आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मात्र, थेट राष्ट्रवादीलाच या प्रकरणात ओढलं आहे. संभाजी छत्रपती यांचं नेतृत्व तयार होत होतं. त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. त्यांच्या राजकीय उदयामुळे भाजपला कोणतंच नुकसान नव्हतं. पण पश्चिम महाराष्ट्रात संभाजीराजेंमुळे कुणाला नुकसान होणार हे सर्वांना माहीत आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. तर, श्रीमंत शाहू महाराज यांना कुणी तरी चुकीची माहिती दिली असावी. चुकीची माहिती पुरवणाऱ्यांनी संभाजी छत्रपती आणि श्रीमंत शाहू महाराज यांच्यात अंतर आहे असं भासवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. एक गोष्ट निश्चित वाटते. संभाजीराजे यांचं नेतृत्व गेल्या सहा वर्षात चांगल्या प्रकारे तयार होत होतं. होतं आहे. मराठा आणि बहुजन समाजात त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अशा प्रकारचं नेतृत्व तयार झाल्यानंतर तेही पश्चिम महाराष्ट्रात असं नेतृत्व तयार झाल्यानंतर त्याचं कोणतंही नुकसान भाजपला नाहीये. त्याचं नुकसान कोणाला आहे. हे मी सांगायची आवश्यकता नाही. त्यामुळे हे नेतृत्व तयार होऊ नये. ते थांबावं अशा प्रकारचा प्रयत्न कोण करतंय हे ज्याला राजकारण कळतंय त्याला सांगण्याची गरज नाही, असं सांगत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
आभार मानण्याकरिता छत्रपती संभाजी राजे मला भेटले होते. त्याआधीच त्यांनी घोषणा केली होती की ते कोणत्याही पक्षाची तिकीट घेणार नाही. त्यांनी स्वतंत्र उभे राहणार असे जाहीर करत आमच्याकडे अपक्ष म्हणून सर्व पक्षांनी ( भाजप सह ) पाठिंबा दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मी त्यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला तर हायकमांडकडे सर्व माहिती मांडेल असे आश्वासन दिले होते. पण काही लोक ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते नक्कीच उघडे पडतील, असं फडणवीस म्हणाले.
काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली. त्या लोकांना हे समजत नाही की त्यांचा अशा वागण्यामुळे एका बाजूला ते छत्रपती संभाजीराजेंना खोटे ठरवत आहेत. तर दुसरीकडे ते शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात काही अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे असं करत आहेत त्यांच्या अशा वागण्याबद्दल मला प्रचंड दुःख आहे, असंही त्यांनी सांगितलं.