नागपूर | 11 सप्टेंबर 2023 : मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेच अजूनही सुटलेला नाही. राज्य सरकारने दोन जीआर काढले. पण एकाही जीआरने मराठा समाजाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तिकडे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसींनी विरोध केला आहे. ओबीसी नेत्यांनी आंदोलने सुरू केली आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा नेत्यांनी थेट मराठा नेत्यांनाच इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर एकवेळ रामदास आठवले यांना मदत करू, पण मराठ्या नेत्यांना पराभूत करू, असा इशाराच मराठा समाजाने दिला आहे. तसेच महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर आरक्षण द्या, असा इशाराही मराठा नेत्यांनी दिला आहे.
मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी हा इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. जर त्यात अपयश आलं तर समाजातील नेत्यांना आम्ही कुठेही फिरू देणार नाही. त्यांना निवडून येऊ देणार नाही. रामदास आठवलेंना मदत करू पण त्यांना मदत करणार नाही, असा इशारा दिलीप जगताप यांनी दिला आहे.
भाजपने आरक्षण दिल तरी आम्ही त्यांच्याबरोबर राहू. पण ओबीसींना उभं करायचं आणि मराठ्यांमध्ये दोन भाग करून दरी निर्माण करायची हे करू नका. हे परवडणारं नाही महाराष्ट्रात मणिपूर करू नका हे आमची विनंती आहे, असं आवाहन दिलीप जगताप यांनी केलं. मणिपूर लहान होतं. महाराष्ट्र खूप मोठा आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे टाळता येईल तेवढ टाळा अशी माझी विनंती आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ज्वलंत प्रश्न झाला आहे. जन्ममरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे. 50 टक्क्यातून द्या किंवा मग 50% च्या बाहेरून द्या पण आरक्षण द्या. आमचा योद्धा गेले 12 दिवस उपोषण करतो आहे. त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. मात्र मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला जर महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर आम्हाला आरक्षण द्या, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आरक्षणाची मर्यादा वाढवणे राज्य सरकारच्या हातात नाही. पण त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्यांनी आमच्यासोबत दिल्लीला यावं. आम्ही त्यांची तिकीट काढतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांनी बोलावं, अशी मगाणीही त्यांनी केली.
जे ओबीसी नेते उपोषण करतात त्यांचा बोलविता धनी कोण आहे? मी कोणाचं नाव घेणार नाही. पण थोडक्यात सांगतो. ही सगळी सूत्र नागपुरातून हलत आहेत, असा आरोप करतानाच मराठ्यांना सरसकट आरक्षण का देण्यात येणार नाही? आम्ही मराठा म्हणतोय ना, आमच्या सर्टिफिकेटवर हिंदू मराठा आहे ना, मग कुणबी कशाला शोधत बसता? तुम्हाला द्यायचं आहे तर सकल मराठ्यांची ही मागणी आहे. ज्यांना नाही घ्यायचं ते नाही घेणार, असंही ते म्हणाले.
ओबीसीच आंदोलन हे राजकीय स्टंट आहे. त्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. तुम्ही रस्त्यावर उतरून जर दुसऱ्यासाठी काम करत असाल आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात पडले तर त्याची जबाबदारी ओबीसी संघटनांवर राहील, असं सांगतानाच सर्व पक्षीय बैठक ही वेळकाढूपणा आहे. त्यातून काही होणार नाही. मात्र आमचा योद्धा आहे, त्याची प्रकृती ढासळत आहे. सर्वपक्षीय बैठकीतून 50% च्या आत आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. ओबीसीची समजूत काढावी आणि आरक्षण द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.