नागपूर : नागपुरातील नवीन पोलीस भवनाच्या इमारतीवरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव प्रमुख पाहुण्याच्या यादीतून वगळून आमदारांच्या यादीत लिहिल्याने वाद निर्माण झाला आहे. यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी माफी मागावी असे म्हणत भाजपच्यावतीने या कृत्याचा जाहीर निषेध केला. भाजपचा एकही आमदार या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते तथा माजी आमदार गिरीश व्यास यांनी दिली. या पत्रिकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचेही नाव त्यांना न विचारता टाकण्यात आल्याचा दावाही पत्रकार परिषदेत करण्यात आला. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे होत असताना ज्या कोणत्या अधिकारी यांच्या चुकीने विरोधी पक्षनेते हे घडले त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. तसेच राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री (Guardian Minister) यांना प्रोटोकॉल कळत नाही का? गृहविभागाच्या अधिकाऱ्यांनी हे कळत नाही, का असा सवाल उपस्थित करत हे खपवून घेतले जाणार नाही, असेही गिरीश व्यास म्हणालेत.
कलुषित आणि खालच्या दर्जाचे राजकारण या पत्रिकेच्या यादीतून नाव लिहिण्यावरून महाविकास आघाडी सरकारने केली आहे. या संदर्भात दोषींची चौकशी व्हावी. तसेच राज्यपाल यांनाही भेटून या संदर्भात कारवाई करणार असल्याचेही भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोलीस भवनाचं उद्घाटन करत आहेत. यांच्या पत्रिकेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव खाली लिहिण्यात आलंय. हा त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे. सोबतच पत्रिकेत विरोधी पक्षनेते महाराष्ट्र असा उल्लेख करण्यात आला तो चुकीचा अर्थ निघत आहे. फडणवीस हे महाराष्ट्र विरोधी आहे, असं म्हणायचं का असा प्रश्न निर्माण होत आहे, असा आरोप गिरीश व्यास यांनी केलाय.
गिरीश व्यास म्हणाले, या साऱ्या प्रकाराचा निषेध करून हे कोणत्या अधिकाऱ्याने हा प्रकार केला याची चौकशी करण्याची मागणी करत आहोत. या पोलीस भवनाच्या निर्माणाच सगळं श्रेय फडणवीस यांचं आहे, त्यांनी हे काम मार्गी लावलं. सत्ता परिवर्तन झालं असलं तरी फडणवीस यांना संसदीय पद्धतीने मान देणं गरजेचं आहे. अजित पवार आणि गृहमंत्री यांनी या चुकीसाठी माफी मागावी. या कार्यक्रमावर भाजप बहिष्कार टाकत आहे आणि कोणीही भाजप आमदार या कार्यक्रमाला जाणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव पत्रिकेत लिहिलं. मात्र त्यांना कल्पना देण्यात आली नाही. यासाठी हे सरकार दोषी आहे, असंही व्यास म्हणाले.