नागपूर : शेताच्या खरेदी विक्रीवरून झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपींनी मारहाण करून मृतदेह शेतशिवारात फेकून दिला. मृतदेहावरील जखमांवरून त्याचा खून झाल्याचे लक्षात आले. संशयावरून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी खून केल्याची कबुली दिली.
भिवापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या सालेभट्टी (चोरविहीरा) शिवारात गुरुवारी (30 डिसेंबर) युवकाचे प्रेत आढळले. उदालक झोडापे (35, रा. सालेभट्टी) असे मृतकाचे नाव आहे. त्याची हत्या करून प्रेत शेतात फेकून देण्यात आले. संशयाच्या आधारावर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. गुरुवारी दुपारच्या सुमारास सालेभट्टी गावापासून काही अंतरावर असलेल्या खुशाल झोडापे यांच्या शेतात प्रेत आढळून आले. या घटनेची सूचना भिवापूर पोलिसांना मिळाली. ठाणेदार महेश भोरटेकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. गावकर्यांनी मृतक हा उदालक झोडापे असल्याचे पोलिसांना सांगितले.
मृतकाच्या शरीरावर असलेल्या जखमांवरून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. त्या दिशेने त्यांनी तपास सुरू केला. शिवाय ही हत्या दोन दिवसांपूर्वी केली गेली असावी, असाही अंदाज प्रेताच्या अवस्थेवरून वर्तविण्यात आला. मृतक उदालक झोडापे हा मंगळवारी, 28 डिसेंबरला दुपारी घरून गेला. त्यानंतर तो परत आला नाही. त्यामुळे, मंगळवारीच त्याची हत्या झाली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. शेताच्या खरेदी विक्रीवरून सुरू असलेल्या जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी संशयीत म्हणून सुनील ढगे (वय 36), त्याचा भाऊ अनिल ढगे (वय 34) व दोन अन्य संदीप ढगे (वय 36) आणि किशोर ढगे (वय 33) यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सुनील ढगे याने हत्येची कबुली दिली. त्याने व अनिल ढगे यांनी मिळून उदालकचा काटा काढल्याची माहिती आहे. आरोपींविरुद्ध हत्या व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार महेश भोरटेकर तपास करीत आहेत.