नागपूर : जिल्हास्तरीय महिला मेळावा आणि विभागस्तरीय सरस विक्री प्रदर्शनीचे (Saras Exhibition) आयोजन 3 ते 5 जूनदरम्यान विभागीय क्रीडा संकुल मानकापूर, नागपूर या ठिकाणी करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, महिला व बाल कल्याण व आरोग्य विभागांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आलंय. महिला मेळाव्यासाठी नागपूर जिल्ह्यातील सर्व तेराही तालुक्यातील महिला बचत गटातील दहा हजारांपेक्षा जास्त महिलांची उपस्थिती असणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सरस प्रदर्शनीत नागपूर विभागातून ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या विविध नावीन्यपूर्ण वस्तूंची खरेदी नागपूरकरांना करायला मिळणार आहे. त्याचवेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिलांना मार्गदर्शक ठरणारी विविध प्रशिक्षणांचे (Training) आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून कृषी विकास प्रतिष्ठान, बारामतीच्या विश्वस्त सुनंदा पवार ह्या महिला बचत गटांव्दारा सामाजिक, आर्थिक तथा कौटुंबिक विकास या विषयावर प्रबोधन करतील. त्या स्वतः पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध व यशस्वी भीमथडी जत्रेच्या आयोजक आहेत. तसेच वरिष्ठ व्यवसाय व्यवस्थापक हर्षल चंदा, (नवी दिल्ली) हे व्यवसाय व मार्केटिंग या विषयावर तर शैलेश मालपरीकर-सी.ई.ओ. झलकारीबाई महिला किसान उत्पादक कंपनी हे उत्पादक कंपनीची स्थापना व विकास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. केरळ राज्यातील प्रसिध्द संस्था कुटुंबश्रीचे तज्ज्ञ प्रशिक्षक श्रीमती बिना महेसण व अनिमा केरकेटा ह्या उद्योजकतेवर आणि झी मराठी वाहिनीवर प्रबोधन करणारे गणेश शिंदे हे व्यक्तिमत्व विकासवर मार्गदर्शन करणार आहे.
कोविड-19 च्या प्रभावा नंतर प्रथमच विभागीय सरस प्रदर्शनीचे आयोजन सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत नागपूर जिल्ह्यात केले जात आहे. यात 150 स्वयं सहाय्यता बचत गटांचा सहभाग राहणार आहे. त्यात खाद्य पदार्थांकरिता 35 समूह तर इतर विविध प्रकारचे उत्पादन करणाऱ्या समूहांचा समावेश आहे. खाद्य पदार्थांमध्ये शाकाहारी व मांसाहारी अश्या दोन्ही प्रकारच्या खवय्यांसाठी लज्जतदार मेजवाणी असणार आहे. 3 जून रोजी ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या विजेत्या सन्मिता धापटे (शिंदे) तसेच 4 जून रोजी सायंकाळी 7 वा. सा.रे.गा.मा.पा. (झी.मराठी) च्या महाविजेत्या कार्तिकी गायकवाड आणि कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड यांचा सुरेल गीतांचा कार्यक्रम असणार आहे. 5 जून रोजी प्रसिध्द मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची “गप्पा तरुणाईच्या मनातल्या” या विषयावर प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे.