नागपूर : शेतीतील वाद कोणत्या स्तराला जातील काही सांगता येत नाही. घरगुती वादातून बहिणाला भावाने संपविल्याची घटना कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथे तीन जानेवारीला घडली. यामुळं भाऊबंदीचे वाद पुन्हा निर्माण झाले. यापूर्वी नागपुरातही अशीच एक घटना घडली होती. संपत्तीच्या वादातून बहिणीने बहिणीचा काटा काढला होता.
कळमेश्वर तालुक्यातील मोहपा गळबर्डी येथे बहीण-भावामध्ये घरगुती वाद झाला. या वादातून रागाच्या भरात भावाने बहिणीच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. त्यामुळे बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी, तीन जानेवारी रोजी घडली. पिपळा रोड येथील उज्ज्वला अर्पित भोजने (वय ३0) असं मृत बहिणीचे नाव आहे. गळबर्डी मोहपा येथील शरद विठ्ठल गणोरकर (वय ३२) असे आरोपी भावाचे नाव आहे. दोन बहिणी, भाऊ व आई असा परिवार आहे. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. शेती ठेक्याने देऊन व्याजाचे पैसे आई घेत होती.
शेती विकण्यासाठी व घरगुती कारणावरून नेहमी वाद होत असे. उज्ज्वला भोजने ही आईला भेटण्याकरिता दोन दिवसांपूर्वी मोहपा येथे आली होती. सोमवारी सकाळी नऊ वाजता उज्ज्वला घरासमोरील कुंडीमध्ये माती भरत होती. दरम्यान, बहीण-भावामध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात भाऊ शरदने बहिणीच्या डोक्यावर काठीने वार केला. यात तिच्या डोक्याला प्रचंड मार लागला.
उज्ज्वला यांना उपचाराकरिता सावनेर येथे दवाखान्यात नेण्यात आले. परंतु, डोक्याला जास्त मार लागल्यानं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी पंचनामा करून आरोपी शरद याला अटक केली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मारूती मुळूक, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण मुंडे करीत आहे. आता बहिणीच्या खुनाचा ठपका भावावर लागला. कारण क्षुल्लक असले, तरी बहिणीचा जीव गेला. तर, दुसरीकडं भावालाही जेलची हवा खावी लागणार आहे.