यवतमाळ : डॉ. हनुमंत धर्मकारे (Dr. Hanumant Dharmakare) हे रुग्णालयात ड्युटीवर असताना एका उमरखेडमधील अपघातग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर योग्य उपचार झाले नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. ही सल मनात ठेऊन त्याचा वचपा काढण्यासाठी डॉक्टरवर गोळीबार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याची माहिती आहे. त्यातून हे हत्याकांड घडले असल्याची माहिती आहे. 11 जानेवारीला डॉ. हनुमंत धर्मकारे यांची उमरखेड शहरातील साकळे विद्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या (murder case) करण्यात आली होती. आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आज उमरखेड शहरसुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आले.
अकरा जानेवारीला एका डॉक्टरची गोळ्या घालून निर्दयपणे हत्या करण्यात आली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस विभागाने 5 पथक तयार केले होते. या प्रकरणचा छडा लावणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होते. राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उमरखेडमध्ये तळ ठोकून बसले होते.
डॉ. धर्मकारे यांच्या छातीत एक व पाठीत तीन अशा चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळं आधीच कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टीने अतिशय संवेदनशील शहर असलेल्या उमरखेडसह यवतमाळ जिल्हा व वैद्यकीय क्षेत्र हादरले होते. पोलिसांनी एकूण 15 पैलूवर तपास या प्रकरणी केला होता अशी माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी दिली.
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्रचा वापर करून हल्ले करण्यात आले आहेत. जिल्ह्यात हे अग्निशस्त्र आले कुठून याचाही तपास करणे गरजेचे आहे. डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यात डॉक्टर संघटनांनी बंद पाळला. या प्रकरणाचा लवकर छडा न लागल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर संघटनांनी दिला होता.