चंद्रपूर : भद्रावतीचे तहसीलदार डॉ. नीलेश खटके याला 25 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानी ही कारवाई केली. तहसीलदार डॉ. नीलेश खटके याला त्यांच्या कार्यालयातच लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.
वीटभट्टीसाठी मातीची गरज असते. या मातीच्या उत्खननाची परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदारांकडं असतात. यासाठी तहसीलदाराने लाच मागितली होती. पण, लाच देणे शक्य नसल्यानं संबंधित ग्राहकानं नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून तहसीलदाराला अटक केली.
विटा भट्टीसाठी लागणाऱ्या लाल मातीच्या उत्खननाची परवानगी देण्यासाठी तहसीलदाराने 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. दोन महिन्यांपूर्वीच पोंभुर्णा तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत खटके यांची भद्रावती येथे बदली झाली होती. खटके याला अटक झाल्यानं महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तहसील कार्यालयात या ना त्या कारणासाठी नागरिकांना यावे लागते. अशावेळी काही कर्मचारी लाचेची मागणी करतात. ज्यांचे काम अडते असे नागरिक लाच देऊन कामे काढून घेतात. पण, ज्यांना शक्य नसते. त्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. या कारवाईमुळं लाच घेणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले. आपली कुणी तक्रार तर करणार नाही ना, अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली आहे.