चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात वास्तव्याला असणाऱ्या गावातील महिलांना वाहनचालक प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. परिघातील महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी भरारी उपक्रम आखण्यात आला आहे. या माध्यमातून आता महिलांना सफारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जिप्सीचे चालक म्हणून प्रशिक्षित केले जात आहे. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. पहिल्या टप्प्यात तीन गावांतील महिलांना संधी देण्यात आली आहे. ताडोबा बफर क्षेत्रातील जवळपासच्या विशेषतः कोअर क्षेत्राच्या अगदी जवळच्या गावांतील १८ ते ३५ वयोगटातील महिलांकरिता चारचाकी वाहन प्रशिक्षण शुरू करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात खुटवंडा, घोसरी आणि सीतारामपेठचा समावेश करण्यात आला आहे. यानंतर कोलारा, सातारा, ब्राह्मणगाव, भामडेळी, कोंडेगाव आणि मोहर्ली गावांमधील महिलांना संधी दिली जाणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी एकूण ८४ अर्ज वनविभागाला प्राप्त झाले. उपक्रमातील सहभागींना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासोबत लर्निंग आणि पक्के लायसन्स प्राप्त होईल. या प्रशिक्षणाचा सर्व खर्च ताडोबा-अंधारी व्याघ्रसंवर्धन प्रतिष्ठान यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
घरी केवळ एखादं दुसरी दुचाकी असलेल्या या गृहिणी महिलांनी आपल्याला मिळालेली संधी किती महत्त्वाची आहे, हे जाणून या प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षकांनी आखलेल्या वेळापत्रकानुसार सर्व महिला वाहन प्रशिक्षणात काटेकोर राहिल्या. त्यांचा नवा रोजगार प्राप्त व्हावा यासाठीचा ध्यास आनंद देणारा असल्याची प्रतिक्रिया वाहन प्रशिक्षक विवेक जिराफे यांनी दिली.
ताडोबात इथल्या वन्यजीव गाईड्सना इंग्रजी प्रशिक्षण, वन्यजीव विषयक माहितीच्या कार्यशाळा यासह विविध उपक्रमाद्वारे प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्यातच आता गावातील महिलांना वाहन चालकाचे प्रशिक्षण दिले जाते. ताडोबातील पर्यटनविषयक सेवा अधिक परिणामकारक होणार असल्याची भावना वनपरिक्षेत्राधिकारी साईतन्मय डुबे यांनी व्यक्त केली.
जगातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्रविषयक पर्यटन स्थळ म्हणून ताडोबाची ओळख आहे. ताडोबात वाघ आणि जंगल अनुभवण्यासाठी पोचणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत इथल्या सेवा अधिक पर्यटकाभिमुख करण्याच्या व्यवस्थापनाच्या पुढाकाराला पर्यटक कसे प्रतिसाद देतात यावर या प्रयोगाचे यश अवलंबून आहे. अर्थात ताडोबा परिघातील महिलांसाठी ही एक आव्हानात्मक संधी देखील आहे.