नागपूर : संपामुळे (strike) बंद असलेल्या एसटी बसेस खराब होण्याची भीती आहे. बंद एसटी बस (Bus) खराब होऊ नये म्हणून मेकॅनिकल विभागात धडपळ सुरू आहे. बंद असलेल्या बसेस खराब होऊ नये म्हणून रोज 15 मिनिटे बस सुरू ठेवल्या जातात. बस खराब होऊ नये म्हणून आगारातंच बस फिरवल्या जातात. बसचे टायर खराब होऊ नये म्हणून टायरमधील हवा रोज चेक केली जात आहे. नागपुरातील गणेशपेठ आगारात बंद असलेल्या 100 बस चांगल्या स्थितीत आहेत.
एसटी महामंडळाने पर्यायी व्यवस्था म्हणून चक्क खासगी कंपनीकडे एसटीचे स्टेअरिंग सोपविले आहे. त्यामुळं नागपूर विभागात एसएसके सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड या खासगी एजन्सीच्या माध्यमातून बारा बसेस बुधवारला धावल्या. सरकारी बस आणि खासगी चालक असे समीकरण आता प्रशासनाने तयार केले आहे. तर संपकरी कर्मचार्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाईचे सत्र सुरूच आहे. बुधवारला आणखी तेरा कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले.
संपामुळे एसटीचे चाके थांबल्याने आता खासगी चालकांकडून बसगाड्या धावण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचारी संपावर आहे. संप मिटत नसल्याने हतबल झालेल्या प्रशासनाने अखेर एसटीचा गाडा पुढे रेटण्यासाठी खासगी एजन्सीला नियुक्त केले आहे. बुधवारला एसएसके सर्व्हिसेस प्रा. लि.कडून बारा खासगी चालकांनी बसचे परिचालन केले. तर बुधवारला संपकर्त्या कर्मचार्यांपैकी गणेशपेठ आगारातील नऊ चालक व चार वाहक असे तेरा कर्मचारी पुन्हा बडतर्फ करण्यात आले आहेत. यासोबतच एकूण बडतर्फ कर्मचार्यांची संख्या 121 वर पोहचली आहे. एसटी महामंडळाकडून चालकासाठी सेवानिवृत्त कर्मचार्यांकडूनही अर्ज मागविण्यात आलेत. त्यापैकी काही अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्याकडून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे.