नागपूर : नागपुरात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महिन्याभरानंतर ते नागपुरात आले. ते म्हणाले, मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे माझे सहकारी आहेत. आम्ही सोबत काम केलं आहे. आज ते लीडर आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. माझं संपूर्ण सहकार्य त्यांना राहील. एकनाथ शिंदे हे यशस्वी मुख्यमंत्री झाले पाहिजे. होतील. त्यांच्यात गुण आहेत. यासाठी सर्वात जास्त सहकार्य मी करणार आहे. दोघं मिळून विशेषता महाराष्ट्राची जी गाडी खाली उतरली आहे ती रुळावर आणणार. महाराष्ट्राला देशात नंबर एकच राज्य करणार आहोत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. विदर्भात (Vidarbha) सिंचनाचे प्रश्न आहेत. सिंचनासाठी केंद्राकडून पैसे आणले. त्यातून सिंचनाचे (Irrigation) प्रश्न मार्गी लावायचे आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा यांसह माझ्या संमतीनं हा निर्णय झाला. सरकार बाहेर राहून चालत नाही, असं भाजपच्या पक्ष श्रेष्ठींना वाटलं. त्यामुंळ मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. सरकार चालवायचं असेल, तर सरकारमध्ये गेलं पाहिजे. या वरिष्ठ्यांच्या निर्णयामुळं मी निर्णय बदलला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याचा मला कुठलाही कमीपणा नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमित शहा भक्कमपणे आमच्या मागे उभे राहिले. निवांत याची पूर्ण स्टोरी सांगणार आहे. हे सरकार अडीच वर्षे चालणार आणि त्यानंतर बहुमत आणणार आहे. काँग्रेसने मोदी यांना चायवाला म्हणून हिणवलं. मोदीजींनी त्यांना पाणी पाजलं. आम्ही रिक्षावाले असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. पानटपरीवाले असू त्याचा अभिमान आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना हे कळणार नाही. पहिल्या दोन महिन्यांत सेनेतील खदखद लक्षात आली होती. पण राजकारणात योग्य वेळी योग्य गोष्टी करायच्या असतात. आम्ही अनपेक्षित धक्का दिला. पण आज सगळे कार्यकर्ते खुश आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
फडणवीस म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तार लवकरंच आम्ही करु. कारण याबाबत बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही. कारण मुख्यमंत्री ठाण्याला गेले नव्हते. मी पण नागपुरात आलो नव्हतो. सामनाला मी मुख्यमंत्री झालो नाही याचं दु:ख असणार का? हा उपहास आहे. हिवाळी अधिवेशन नागपुरातच होणार. काहीही झालं तरी नागपुरातंच होणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. विचाराने जे शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना शिंदे यांची खरी सेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पारिवारिक वारसा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. पण वैचारीक वारसा ही वेगळी बाब आहे.