नागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांचं कामठी-मौदा मतदार संघातून तिकीट कापण्यात आलं होतं. त्यासाठी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचं बोलल जात होतं. परंतु, आता विधान परिषदेत बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळविला. तेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) म्हणतात, पक्षाच्या महामंत्री पदावर चंद्रशेखर बावनकुळे होते. हा विधान परिषदेमध्ये कम बॅक आहे. हा कम बॅक असा आहे की, नेव्हर गो बॅक विजय!
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयानं महाविकास आघाडीला चपराक दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत सहापैकी चार जागी भारतीय जनता पार्टी निवडूण आली आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्रित आलेत. म्हणजे सगळ्या प्रकारचा विजय होऊ शकतो, अशाप्रकारचं गणित चुकीचं आहे. हे या विजयानं स्पष्ट केलंय, असंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे सहकारी विजय झाल्याबद्दल मी आनंदी आहे. महाराष्ट्रातील जनता ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी आहे. हे या निवडणुकीवरून सिद्ध झालंय. भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल, असा आशादाद फडणवीस यांनी व्यक्त केलाय. बावनकुळे यांच्या विजयानं महाविकास आघाडी सरकारला चपराक बसली आहे, असं फडणवीस म्हणाले.
विजयानंतर देवेंद्र फडणवीस हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी आले. फडणवीस यांनी बावनकुळे यांचं अभिनंदन केले. यावेळी बावनकुळे यांना अश्रू अनावर झाले होते. फडणवीस यांना भेटताना बावनकुळे अतिशय भावूक झाले होते. बावनकुळे यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू भरून आले.
फडणवीस म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही लढलो. महाविकास आघाडीची मते अकोला आणि नागपूरमध्ये भाजपला मिळाली. ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार त्यांनी मानले. महाविकास आघाडीच्या काही मतदारांनी भाजपवर विश्वास दाखविला. अकोल्यात वसंत खंडेलवाल निवडूण आले. विजयाच्या मालिकेची सुरुवात झाली.