चंद्रपूर : गेल्या आठवड्यात सावली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या धानाचं नुकसान झालंय. वरच्या पावसामुळं हातात आलेले पीक गेलं. तरी शेतकऱ्यांनो खचू नका, असा धीर देत शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून कोणत्याही परिस्थितीत मदत करू, असा विश्वास राज्यांचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला.
सावली तालुक्यात नुकसान झालेल्या मुंडाळा, पाथरी, उसरपार (तुकूम), मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करताना ते बोलत होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले की, अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय. त्यामुळं शेतकऱ्यांचं पूर्ण वर्षभराचं बजेट कोलमडलंय. सावली तालुक्यात जवळपास 35 गावांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या भागात होणारा जय श्रीराम नावाचा धान 2500 ते 2700 रुपये प्रति क्विंटलने घेतला जातो. 5 एकरामध्ये शेतकऱ्याला एक ते सव्वा लाखाचे उत्पन्न मिळते. मात्र, हे लाख रुपयाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातून गेलंय. शेतकऱ्यांची ही व्यथा जाणून घेण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी आठ ते दहा गावांना भेटी दिल्या.
शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू व त्यांच्या मदतीची आर्त हाक यावेळी दिली. सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहोत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश संपूर्ण प्रशासनाला दिले आहे. तसेच ज्वारी आणि चन्याचा त्वरित पुरवठा करून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कसे सावरता येईल, हा आमचा प्रयत्न राहणार आहे, असं पालकमंत्र्यांनी सांगितलं.
यावेळी पालकमंत्र्यांनी मुंडाळा येथे रामदास वरखडे, पाथरी येथे मधुकर गायकवाड, उसरपार येथे काशीनाथ चौधरी, मंगळमेंढा येथे शालिकराम निसार, पालेबारसा येथे रमेश तिजारे तर सायखेडा येथे उद्धव टेंभुर्णे यांच्या शेतातील नुकसानग्रस्त धानाची पाहणी केली. तसेच परिसरातील मुक्तेश्वर मंगर, सुभाष तिवाडे, रामदास घनदाटे, राजेंद्र वाघरे, डेबूजी तिवाडे आदी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सायखेडा येथील 70 वर्षीय शेतकरी उद्धव टेंभुर्णे यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांना नुकसान झालेल्या धानपीक दाखवून आपली व्यथा मांडली. संपूर्ण आयुष्यात एवढा पाऊस कधीच बघीतला नाही. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहो. या पिकातून काहीच हाती लागणार नाही. शेतातील हलाखीची परिस्थिती पाहून झोप लागत नाही. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.