नागपूर : कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालये, लॉन, सभागृह आदींमध्ये होणारे समारंभ, लग्नसोहळे आदींसाठी शासनाने 50 जणांच्या उपस्थितीचे निर्बंध घातले आहे. परंतु, अशा समारंभांमध्ये देखील कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. अशा 6 लॉनवर महापालिकेच्या उपद्रव शोधपथकाने कारवाई केली आहे. तसेच लॉनसह एकूण 15 प्रतिष्ठांवर केलेल्या कारवाईतून (Action) एकूण 1 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पथकाने मनपाच्या गांधीबाग झोनअंतर्गत रमेश दायरे, दसरा रोड, तुळशीबाग येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल 5 हजार तसेच सचिन राव हिरूलकर बजेरिया येथेसुद्धा वाढदिवस कार्यक्रमामध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल 10 हजार दंड लावण्यात आला.
आशीनगर झोनअंतर्गत प्रल्हाद आनंद लॉन व गोथरा लॉन टेका नाका, कामठी रोड, श्याम लॉन काटोल रिंग रोड, राज सेलिब्रेशन गोरेवाडा रिंग रोड यांच्याविरुद्ध कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल 25 हजार प्रत्येकी असे 1 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नुकतेच एक आदेश काढून समारंभात 50 लोकांची उपस्थितीचे बंधन घातले आले. तसेच मंगल कार्यालय, लॉन मालकांना त्यांच्याकडील आयोजनाची माहिती संबंधित झोनला देणे आवश्यक आहे. उपद्रव शोधपथकाने हनुमाननगर झोनअंतर्गत देशी वाईन शॉप आणि धंतोली झोनअंतर्गत एसएमई वाईन शॉपवर कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला.
राज्य सरकारने बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास येते. उपद्रव शोधपथकाने यासंदर्भातही कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणार्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल. दंडही वसूल करण्यात येणार आहे. दरम्यान, पथकाने 71 पतंग दुकानांची तपासणी केली. उपद्रव शोधपथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.
तिसऱ्या लाटेसाठी नागपूर जिल्ह्यातील सरकारीसह खाजगी रुग्णालय सज्ज आहेत. शहरातील काही खाजगी रुग्णालयांनी नवीन आयसीयू सज्ज केले आहेत. प्रसिद्ध ॲार्थोपॅडीक सर्जन डॅा. संजीव चौधरी यांच्या रुग्णालयात नवीन आयसीयू सज्ज
आहेत. चौधरी हॅास्पिटलमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीनं ॲाक्सिजन प्लांट सुरू करण्यात आलंय.