गडचिरोली : जिल्ह्यातील मोसम गावातील शेतालगतच्या नाल्यात पुरलेला वाघाचा मृतदेह गुरुवारी सापडला. जंगलात गस्तीवर असताना वनरक्षक एन. एम. परचाके, अतुल कतलामी यांना ही बाब निदर्शनास आली. वरिष्ठांना कळविल्यानंतर खात्री पटली. मृत वाघ पूर्ण वयाचा आणि मादी असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ही घटना आहे अहेरी वनपरिक्षेत्रातील. मोसम गावालजवळ नाल्यालगत दुर्गंधी येत होती. बाजूला माश्या उडत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वनविभागाच्या अधिकार्यांनी गुरुवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली. जमिनीत काहीतरी पुरून असल्याचे समोर आले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्यांनी पुरून असलेल्या ठिकाणची माती काढली. त्याठिकाणी चक्क वाघालाच पुरून ठेवले होते. ते सारं पाहून वन कर्मचार्यांना धक्काच बसला.
मृत वाघ सात ते आठ दिवसाआधी जमिनीत पुरला असावा. उग्रवास व जंतू निर्माण झाले होते. वनकर्मचार्यांना अडचण निर्माण झाली होती. तपास करताना मृत वाघाचे पंजे व डोकं गायब असल्याचं उघडकीस आलं. शिकार झालेल्या घटनास्थळापासून काही अंतरावर ताराचे तुकडे आढळले. त्यालगतच उच्च दाबाची विद्युत तार गेले होती. वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या हेतूने जिवंत तारावरून जाळे पसरविले होते.
घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आशिष पांडे, मानद वन्यजीव रक्षक उदय पटेल, देवलमरीचे सरपंच श्रीनिवास राऊत, एनटीसीएचे प्रतिनिधी लक्ष्मण कन्नाके व इतरांच्या समक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तरेश्वर सुरवसे, डॉ. पवन पावळे व डॉ. ज्ञानेश्वर गहाणे यांच्या पॅनलने मृत वाघाचे शवविच्छेदन केले. नमुने प्रयोगशाळेत तपासणी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. मृत वाघाचे शव पंचासमक्ष दहन करण्यात आले. तपास वनपरिक्षेत्र अधिकारी योगेस शेरेकर व शिल्पा शिगोण करीत आहेत.
दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. तीही याच वनपरिसरात. शिकार करण्यासाठी विजेची तार लावण्यात आली. विद्युत तारेला स्पर्श होऊन दोन वन्यजीव ठार झाले. शिवाय शिकारीही या तारांमध्ये अडकला. त्याचा जीव गेला होता. या भागात सांभर, चितळ, रानडुक्कर यांची शिकार करण्यासाठी सापळा लावला जातो. अशाच सापळ्यात हा वाघ अडकला असावा.