गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात घेण्यात आलेली भाजपची प्रचारसभा उमदेवारांसाठी की माजी आमदारांचे रुसवे फुगवे सोडविण्यासाठी?, असा रोष माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर व्यक्त केला. माजी आमदार रमेश कुथे यांनीही मुलाला तिकीट न दिल्याचं दुःख व्यक्त केलं. या दोघांनाही धीर देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
गोंदिया जिल्ह्यात 21 डिसेंबरला जिल्हा परिषेची निवडणूक होत आहे. प्रचारासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांच्यासमोर दोन माजी आमदारांनी नाजारी व्यक्त केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार गोपाल अग्रवाल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणूक लढविली. मात्र त्यावेळी भाजपच्या कुठलेही बडे नेते आमदार, खासदार तर सोडा जिल्ह्याचे कोणतेही नेते माझ्या प्रचारासाठी गोंदियात आले नाही. उलट 2014 च्या निवडणुकीत गोपाल अग्रवाल हे काँग्रेस कडून लढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा गोंदियात झाली. तरीदेखील या ठिकाणी गोपाल अग्रवाल यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रभाव केला. मी 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून उभा असताना कोणी माझ्या प्रचाराला आले नाही, अशी खंत गोपाल अग्रवाल यांनी व्यक्त केली. मात्र आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व बडे नेते प्रचाराला आले आहेत. मंचावर उपस्थित असलेल्या काही नेत्यांनी मला पाडण्यासाठी भाजप बंडखोर अपक्ष चाबी छाप नेत्याला मदत केली, असा आरोप गोपाल अग्रवाल यांनी लावला.
गोंदिया विधानसभेवर शिवसेनेचा 10 वर्षे भगवा फडकविणारे माजी आमदार रमेश कुथे यांनी देखील शिवसेनेला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्या मुलाकरिता नगरा जिल्हा परिषद क्षेत्रातून जिल्हा परिषदेची तिकीट मागितली. मात्र भाजपने तिकीट नाकारली. त्यांचा मुलगा अपक्ष निवडणूक लढवित आहे. तरीही ते भाजपच्या प्रचारसभेत आले होते. त्यावेळी त्यांनीही रोष व्यक्त केला. माझ्या मुलाला जिल्हा परिषदेची तिकीट दिली नाही. तो अपक्ष उभा आहे. तरीही मी भाजपच्या उमेदवारासोबत असल्याचं त्यांनी बोलून दाखविलं. पण, मुलाला तिकीट न मिळाल्याचं शल्य त्यांना होतं. आता 21 जानेवारीला फैसला होईल, असं रमेश कुथे म्हणाले.
या दोन्ही माजी आमदारांना समाधान करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. गोपालजी तुमच्या निवडूण न येण्यानं विधानसभेचं नुकसान झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तुम्ही 27 वर्षांपासून राजकारणात आहात, याची मला जाणीव असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी गोपाल अग्रवाल यांना धीर दिला. तसंच रमेश कुथे यांचेही दुःख समजून घेतले.