नागपूर : पर्यटनासाठी गाईडचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. गाईडचे एकापेक्षा अधिक भाषांवर प्रभुत्व असते. पर्यटन स्थळांची (Tourist Places) परिपूर्ण माहिती असते. यामुळे पर्यटकाच्या ज्ञानात भर पडते. शिवाय विभागासाठी उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध होतात. गाईड आपल्या कुशलतेने पर्यटकाला समजावून सांगतो. वन विभागाने नागपूर जिल्ह्यातील गाईडला (Guide to Nagpur District) प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी सतत गाईडच्या बैठका घेऊन त्यांचे वर्गीकरण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गाईडच्या अभ्यासानुसार त्यांचे ए, बी व सी श्रेणीत वर्गीकरण करण्यात येणार आहे. गाईड स्वत:ला अपडेट करण्याचा प्रयत्न करतील. वन विभागालाही त्याचा फायदा होईल. यात जंगल सफारीमध्ये (Jungle Safari) कार्यरत गाईडचाही समावेश राहणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक आकर्षण पेंच व्याघ्र प्रकल्पाचे आहे. सातशे किलोमीटर परिसरात हा प्रकल्प पसरला आहे. पेंचच्या पूर्व भागात देवलापार, चोर बाहुली व पवनी क्षेत्र येते. तसेच पश्चिम भागात नागलवाडी व सालेघाट वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. या घनदाट जंगलात शंभरापेक्षा अधिक वाघ आहेत. कोरोनामुळे पर्यटकाची संख्याही कमीच आहे. पण, भविष्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. याध्ये बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रालय, आदास्याचे गणपती मंदिर, रामटेकचे रामचंद्राचे मंदिर, दीक्षाभूमी, सीताबर्डी किल्ला, फुटाळा तलाव, ड्रॅगन पॅलेस, महाराज बाग, अक्षरधाम मंदिर, झिरो माइल या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात.
नागपूर शहर हे ठिकाण देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत पर्यटकांची संख्या घटली. परंतु आता कोरोना निर्बंधात सूट देण्यात आली आहे. त्यामुळं पुन्हा पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. पर्यटकांना चांगल्या गाईडची गरज पडणार आहे. त्यामुळे गाईडचे वर्गीकरण करून ए श्रेणीत असलेल्या गाईडला मिळणाऱ्या मानधनात वाढ होणाराय. मात्र, त्यासाठी गाईडला वनविभागाचे प्रशिक्षण घ्यावे लागले. पर्यटक या प्रशिक्षणाचा लाभ कसा घेतात. यावर त्यांचे श्रेणीवर्धन अवलंबून राहणार आहे.