नागपूर : नितीश गंगाप्रसाद ग्वालवंशी (Nitish Ganga Prasad Gwalwanshi) हे प्रभाग क्रमांक दहाचे नगरसेवक होते. नागपूर मनपात प्रशासक लागल्यानं ते आता माजी नगरसेवक (former corporator) झालेत. प्रभाग क्रमांक दहामधून ते २०१६ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून निवडून आले. त्याशिवाय विशेष कार्यकारी अधिकारी पदही त्यांच्याकडं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. नितीश ग्वालवंशी यांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे (city president Vikas Thackeray ) यांच्याकडं राजीनामा पाठविला. त्यात त्यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपुरात होते. हा मुहूर्त साधून त्यांनी नितीन गडकरी यांचे घर गाठले. त्याठिकाणी त्यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला.
नितीश ग्वालवंशी यांनी येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आहे. ग्वालवंशी हे 2016 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढली. बोरगाव, दिनशॉ फॅक्टरी, कुतुशाहनगर, शीलानगर, रामदेवबाबा, कॉलेज, पोलीस मुख्यालय, पोलीस लाईन टाकळी, पोलीस क्वार्टर, समाधाननगर, आदर्श कॉलनी, अवस्थीनगर, मानकापूर मेंटर हॉस्पिटल, पागलखाना झोपडपट्टी, छावणी, दर्जी मोहल्ला, बैरामजी टाऊन, राजानगर, गोंड मोहल्ला, आंबेडकर नगर, म्हाडा कॉलनी, आकारनगर, मानकापूर विद्युत केंद्र, शिवाजी कॉम्प्लेक्स या त्यांचा प्रभाग दहाचा भाग. या भागात त्यांचा दबदबा होता. काँग्रेसमधून भाजपात आल्यामुळं काँग्रेसला नुकसान सहन करावं लागेल. याचा फायदा भाजपला होणार आहे.
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी याची माहिती त्यांच्या फेसबूक अकाउंटवरून जाहीर केली. विकास ठाकरे यांना पाठविलेल्या राजीनाम्याची प्रत त्यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटला शेअर केली.