नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी फुटाळ्यातील प्रेक्षक गॅलरी अनावश्यक असल्याचं म्हटलं. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कामाची चौकशी व्हावी, असं राऊत यांना वाटतं. शुक्रवारी नितीन राऊत यांनी लेजर शो आणि प्रेक्षक गॅलरीला भेट दिली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी नितीन गडकरी यांनीही या प्रकल्पाची पाहणी केली. कामाच्या प्रगतीचे कौतुक केले. यामुळं हा वाद कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकल्पासाठी नितीन गडकरी यांनी रस्ते परिवहन मंत्रालयाच्या केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) मंजूर करून घेतला. या प्रकल्प महामेट्रोद्वारे पूर्ण करण्यात येत आहे. गडकरी या कामाचे कौतुक करतात, तर नितीन राऊत कामावर संशय व्यक्त करतात. महापालिका निवडणुका लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तर हा वाद सुरू झाला नसेल, ना असं नागरिकांना वाटतं.
नितीन राऊत हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राऊत म्हणतात, नागपूर सुधार प्रन्यासनं फुटाळ्याचा खऱ्या अर्थानं विकास केला. हा परिसर नागपूरकरांसाठी अतिशय आवडीचं ठिकाण आहे. याठिकाणी प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात येत आहे. या गॅलरीमुळं तलावाचे दृश्य पाहण्यात अडचण होणार आहे. त्यांच्या दृष्टिकोणातूनही गॅलरी रोडच्या मागे चांगली झाली असती.
नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री आहेत. राऊतांच्या या आरोपाला उत्तर देण्यासाठी गडकरी यांनी शनिवारी फुटाळा तलावाचा दौरा केला. गॅलरीचे निरीक्षण केले. यावेळी नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आणि महामेट्रोचे संचालक महेशकुमार हेही उपस्थित होते. गडकरी यांनी नासुप्रला लेजर शोचे काम त्वरित पूर्ण करण्याची सूचना महामेट्रोला केली. लेजर शो सुरू होईल. गॅलरी तयार झाल्यानंतर येथे आकर्षण नजराना दिसणार आहे. विदर्भातून येथे पर्यटक येतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.