नागपूर : टीव्ही 9 मराठीचे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बोर्ड ॲाफ स्टडीजच्या (Board of Studies) सदस्यपदी निवड करण्यात आलीय. नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या अभ्यास मंडळाचा सदस्य म्हणून नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (Vice-Chancellor) डॉ. सुभाष चौधरी यांनी गजानन उमाटे यांची ही निवड केलीय. गजानन उमाटे (Gajanan Umate) गेल्या 15 वर्षांपासून टीव्ही माध्यमात कार्यरत आहेत. नागपूर विद्यापीठात मास कॉमचा अभ्यासक्रम ठरविण्यात उमाटे यांना सदस्य म्हणून संधी मिळणार आहे. अशावेळी टेलिव्हीजन माध्यमात त्यांनी जे काम केलंय, त्याचा फायदा विद्यापीठातील मास कॉमच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. मुंबईतीलचं नव्हे तर राज्यभर आणि देशात परराज्यात जाऊन रिपोर्टिंगचा अनुभव गजानन यांनी घेतला.
गजानन उमाटे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील किन्हाळा येथे झाला. प्राथमिक शिक्षण गावातच झालं. पदवीसाठी ते नागपुरात आले. बी. ए. इंग्रजी लिटरेचरमध्ये धरमपेठ महाविद्यालयातून उत्तीर्ण केलं. नागपूर विद्यापीठातून प्रथम श्रेणीत बीएमसी उत्तीर्ण केलं. त्यानंतर पी.जी.साठी ते मुंबईतील भवन्स येथे गेले. टेलिव्हीजन मीडियामधून त्यांनी पीजी केलं. त्यानंतर सागर विद्यापीठातून मास्टर इन मास कॉम पूर्ण केलं. टेलिव्हीजन माध्यमात गेल्या 15 वर्षांपासून ते कार्यरत आहेत.
टेलिव्हीजन माध्यमात त्यांनी डेस्कवरही काम केलंय. मुंबईत काही वर्षे काम केल्यानंतर ते नागपूरला परतले. कृषी हा त्यांचा आवडता विषय. कृषीशी संबंधित बातम्या ते आवडीनं करतात. कारण वडील शेतकरी. अजूनही वडील गावात शेती करतात. नागपुरात त्यांनी टेलिव्हीजन माध्यमाला गती देण्याचं काम केलंय. नागपुरात काम करत असताना टीव्ही 9 मराठीनं त्यांना राज्याबाहेर रिपोर्टिंगसाठी पाठविलं. केरळमध्ये महापूर आला असताना तिथं जाऊन गजानन यांनी रिपोर्टिंग केलं. कारगील विजय दिन घटनास्थळी जाऊन रिपोर्टिंग केलं. कारगीलमध्ये नेमकं कुठं काय झालं होतं, याचं रिपोर्टिंग त्यांनी केलं होतं. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या वेळी दिल्लीत काय राजकीय हालचाली होत होत्या, त्याचंही रिपोर्टिंग गजानन यांनी केलंय.