नागपूर: राज्य सरकार टीसीएसच्यामाध्यमातून लवकरच डॉक्टर, टेक्निशियनच्या साडे चार हजार जागा भरणार अहोत, तशी घोषणाच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. महाजन यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली आहे. तसेच हाफकिनकडून औषध खरेदी थांबवण्याचा निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आरोग्याच्या अनुषंगाने विधानसभेत प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली. आरोग्य विभागाला जेवढा निधी लागेल तेवढा निधी द्यायचा अशा प्रकारचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. आरोग्याला तर प्राधान्य दिलंच पाहिजे. शिक्षणाला प्राधान्य दिलच पाहिजे. आरोग्य विभागाचं तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे एकूण जे बजेट असतं त्या बजेटपैकी विदर्भाकरता एकूण किती निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.
अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विदर्भासाठी राज्य सरकारने काय काय निर्णय घेतले याची माहिती दिली. तसेच वैष्णवीच्या मृत्यूची माहितीही दिली. वैष्णवीला जेएमसी नागपूर येथे आणण्यात आलं होतं. त्यावेळी व्हेंटिलेटर तिथं उपलब्ध न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
त्यामुळे डॉक्टरांवर आरोप झाले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी म्हैसेकर नावाच्या डॉक्टरांची समिति नेमली आहे. डीन गुप्ता यांना तत्काळ कार्यमुक्त केलं आहे आणि डॉ. सपकाळ जे व्हेंटिलेटर उपलब्ध करू शकले असते त्यांनी न केल्यामुळे त्यांना पदावरून हटवलं आहे, असं महाजन यांनी स्पष्ट केलं.
आम्हीं एमपीएससीच्या माध्यमातून 300 डॉक्टर भरले आहेत. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करता येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करतं अहोत. एमपीएससी मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो, अशी माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.
नागपूर मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णांची संख्या मोठी असते. व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करायची म्हटले तरी ते होतं नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. कारण रुग्णांचा फ्लो मोठया प्रमाणात आहे. लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
2024 पर्यंत जे जे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल करत आहोत. रिचर्ड अँड कूडास येथील जागा 99 वर्षाच्या करारावर देण्यात आली होती. त्यांची मुदत 20 वर्षांपूर्वीच संपली आहे. ती जागा जे जे ला मिळाली तर मोठा फायदा होणार आहे. सध्या हा वाद कोर्टात सुरू आहे. अपेक्षा आहे लवकरच निर्णय लागेल, असंही त्यांनी सांगितलं.