नागपूर : सोशल मीडियाचा वापर वाढला. त्यात इस्टाकडे युवा पिढी मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली. इंस्टाचा वापर करणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण जास्त आहे. हा इंस्टा कामाचा कमी टाईम पासचा जास्त असल्याच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. एका युवतीला इंस्टावर रिल्स (चित्रफित) बनवण्याची सवय लागली. ती रिल्स बनवण्याच्या आहारी गेली. रिल्सशिवाय दुसरं जग तिला नकोस झालं. घरच्यांच्या ही बाब लक्षात आली. आई-वडील रागवायला लागले. तरीही ती इंस्टावर चित्रफित बनवणं, गेम खेळण काही सोडत नव्हती. शेवटी तिला अतिशय भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यामुळे तुम्ही युवक असाल आणि इंस्टाचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला सावध करणारी आहे.
कपीलनगर पोलीस हद्दीतील ही घटना. कडू ले-आऊटमध्ये १९ वर्षीय स्नेहा पंकज शर्मा राहत होती. स्नेही ही पदवीचे शिक्षण घेत होती. तिचे वडील बांधकाम कंत्राटदार आहेत. तर तिची आई गृहिणी आहे. वडील बांधकामानिमित्त दिवसभर बाहेर राहतात. स्नेहाला दहा वर्षांचा लहान भाऊ आहे.
घरी फोन हवा म्हणून वडिलांना स्मार्ट फोन खरेदी करून दिला. स्नेहाला स्मार्टफोनची सवय लागली. ती त्या स्मार्ट फोनचा वापर करून रिल्स तयार करायची. ते रिल्स ती इंस्टावर शेअर करायची. त्याला लाईक्स मिळत होते. ती त्यातच खूश होती. त्यानंतर तिला गेम खेळण्याची सवय लागली.
आई-वडिलांच्या ही बाब लक्षात आली. ते स्नेहाला नेहमी रागवत राहायचे. पण, तिच्यावर त्यांच्या रागावण्याचा काही फरक पडत नव्हता. २८ एप्रिलची ही घटना आहे. स्नेहा इंस्टावर रिल्स बघत बसली होती. आईने तिला एक काम सांगितले. ती रिल्सच्या नादात आईचे काम विसरली. त्यानंतर पुन्हा आईने कामाची आठवण करून दिली. पण, स्नेहाने आईला मदत करण्यास नकार दिला.
रागाच्या भरात स्नेहा घराच्या बाहेर आली. दीक्षितनगरातील चार माळ्यांच्या इमारतीवर चढली. तिथून स्नेहाने थेट उडी मारली. यात तिचा मृत्यू झाला. कपीलनगर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. आठवीत असताना स्नेहाने अशाप्रकारी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.