नागपूर : राज्यात बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेबद्दल सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. शेखर नाफडे यांची सुनील केदार यांनी नवी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर बैलगाड्या शर्यती राज्यात सुरू होणार असल्याची ग्वाही केदार यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारनं बैलगाडी शर्यत सुरू करण्याबाबत 2017 मध्ये कायदा संमत केला होता. परंतु, त्यास मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पुढील आठवड्यात यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी सुनील केदार हे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. शेखर नाफडे यांची भेट घेतली.
कर्नाटक, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगड येथे बैलगाड्यांची शर्यत सुरू आहे. मात्र, उच्च न्यायालयाने बंदी घातल्यानं बैलगाड्या शर्यती महाराष्ट्रात बंद आहेत. यासंदर्भात केदार यांनी ज्येष्ठ विधिज्ञांशी चर्चा केली. बैलगाडी शर्यत सुरू व्हावी, यासाठी राज्य शासन पाठपुरावा करीत आहे. यावर अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयानं द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीनं वरिष्ठ अधिवक्ता म्हणून अॅड. मुकुल रोहतगी, अॅड. शेखर नाफडे आणि अॅड. सचिन पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती केदार यांनी दिली.
शंकरपटाच्या शर्यतीसाठी खिल्लार बैलाची निवड केली जाते. खिल्लार ही महाराष्ट्रात सापडणारी बैलांची जात आहे. शर्यंत बंद असल्यानं खिल्लारच्या बैलांची मागणी कमी झाली आहे. आपली संस्कृती जपली पाहिजे. त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. त्यात नक्कीच यश मिळणार, असल्याचं त्यांनी सांगितलं. शंकरपटांअभावी गावांमध्ये यात्रा भरत नाहीत. बैलगाड्यांची शर्यत ही राज्यात 400 वर्षे जुनी आहे. त्यामुळं जुन्या परंपरा जपणे आवश्यक असल्याचं केदार म्हणाले. शेतीचा हंगाम संपला की शंकरपटांना सुरुवात होते. यासाठी खास बैलांची निवड केली जाते. त्यांना शेकड्याला जुंपले जाते. त्यासाठी बैलांना शर्यतीचा सराव करावा लागतो. बैलांना विशिष्ट खुराग दिली जाते. त्यामुळं ते शर्यतीत टिकतात. जिंकणाऱ्या जोड्यांना बक्षीस दिली जातात.
इतर बातम्या
Z. P. च्या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेच नाही, दिवाळीनंतर झाल्या शाळा सुरू