6 वर्षांचं मुलं म्हणजे दंगा करणे, मस्ती, खेळणं असे चित्र आपल्यासमोर येते. पण याच वयात जर एखादा चुणचुणीत मुलगा बुद्धीच्या पल्याड काही करु लागला तर? तुम्ही त्याला जीनियस म्हणाल. पण नागपुरचा गुगल बॉयने सर्वांनाच त्याच्या अफाट बुद्धीमतेने विस्मयचकित केले आहे. अंतराळ म्हणू नका की देशांची नाव, त्यांच्या राजधान्या, या पठ्याचं सर्व काही अगदी तोंडपाठ आहे. त्याच्या या कौशल्यानं अनेकांना भुरळ घातली आहे.
दोन हजार प्रश्नांची उत्तरं तोंडपाठ
अनिश अनुपम खेडकर या चिमुकल्याने स्पेस सायन्स, रॉकेट,जेट फ्लाईट, हेलिकॉप्टर,जगातील अनेक देशांचे चलनासह अनेक विषयांचे सखोल ज्ञान मिळवले आहे. अनिशची या विषयावरील दोन हजार प्रश्नांची उत्तरं तोंडपाठ झाली आहेत अनिशला अंतरिक्ष व अंतराळवीरांच्या बाबतीत सर्वाधिक रुची आहे. त्यामुळे त्याला स्पेसच्या संदर्भातील 500 तथ्य (Facts) माहिती आहे. अनिश नेत्रदीपक यशामागे त्याची आजी स्मिता पंडित यांचे विशेष योगदान आहे. स्मिता पंडित यांनी कर्करोगाशी लढत असताना अनिशवर केलेल्या संस्कारामुळे तो आज अवघ्या सहाव्या वर्षी गुगल बॉय म्हणून नावारूपाला येत आहे.
आजीशी जमली गट्टी
अनिशचे वय सहा वर्षे आहे. तो अवघ्या २ वर्षांचा होता, तेव्हा नागपुरला आजीकडे राहायला आला होता. अनिशचे वडील अनुपम यांना नोकरीच्या निमित्ताने शहर बदलावे लागतं असल्यामुळे अनिशची आई कल्याणी खेडकर काही काळासाठी आईकडे नागपूरला राहायला आल्या. तो अंतराळसंबंधीच्या चित्रांमध्ये रमायचा. अवघ्या दोन वर्षांचा अबोल बालकाची अंतराळाविषयीची रुची थक्क करणारी होती. इथून अनिशच्या असाधारण बुद्धीमत्तेला आकार देण्याचा प्रवास सुरु झाला. अनिशला सर्वाधिक रस हा स्पेस सायन्समध्ये आहे.