नागपूर : सरकारी कार्यालयं म्हटली की नागरिकांकडून कायमच दिरंगाईच्या तक्रारी होतात. मात्र, नागपूर महानगरपालिकेच्या एका कार्यालयाबाबत वेगळाच धक्कादायक प्रकार घडलाय. नागपूर पालिकेच्या कार्यालयातील संगणकावर नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम न करता थेट पत्ते आणि रमी खेळला जात असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे कार्यालयात रमी खेळतानाचा व्हिडीओ ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागलाय. शिवसैनिक नितीन सोळंके यांनी मोबाईलवर हा व्हिडीओ शूट केलाय.
महानगरपालिकेतल्या सामान्य प्रशासन विभागात सुरू असलेल्या या धक्कादायक प्रकाराविषयी बोलताना नितीन सोळंके म्हणाले, “मी पालिका कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करण्यास गेलो होतो. त्यावेळी कर्मचारी संगणकावर रमी पत्ते खेळत होते. मी त्याचा व्हिडीओ शूट केला. एकीकडे सामान्य लोकांना कामासाठी चकरा माराव्या लागतात, तरी अधिकारी जाग्यावर राहत नाहीत. दुसरीकडे जे अधिकारी जाग्यावर आहेत ते काम करत नाहीत. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून मी हा व्हिडीओ काढला.”
“पत्ते खेळणारे अधिकारी सामान्य प्रशासन विभागातील आहेत. हा व्हिडीओ काढला तेव्हा संबंधित कर्मचारी पत्ते खेळून बाहेर गेला. त्यावेळी मी व्हिडीओ काढला. नंतर ते आल्यावर कार्यालयात पत्ते का खेळता अशी विचारणा केली तेव्हा ते त्यांची कामं झालीत असं म्हणालेत. इतक्या सकाळी कामं होतील असं वाटत नाही. हा गंभीर प्रकार आहे. आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करायला हवी,” अशी मागणी नितीन सोळंके यांनी केली.
Government employees play cards on office computer