नागपूर : जुना जरीपटका भीमनगर झोपडपट्टी या भागातील नागरिकांचे अतिक्रमण हटवताना रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या पुनर्वसनाच्या प्रकल्पाबाबत नवा प्रस्ताव सादर करा. अशा सूचना ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ( Guardian Minister) डॉ. नितीन राऊत यांनी येथे केली. या परिसरातील जुन्या अतिक्रमणाला हटवताना रेल्वे बोर्डाला नवा प्रस्ताव पाठविण्यात यावा. उन्हाळ्यात लोकांना बेघर करू नये. स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त व संबंधित यंत्रणेसोबत समन्वय साधावा. त्यानंतर नवा प्रस्ताव दयावा. नव्या प्रस्तावाचा पाठपुरावा नवी दिल्लीमध्ये रेल्वे मंत्रालयात करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी आर. विमला (Collector R. Vimala), महानगरपालिका आयुक्त (Municipal Commissioner) राधाकृष्ण बी अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भीमनगर झोपडपट्टी व जुना जरीपटका रेल्वे लाईनच्या बाजूला असणारे अतिक्रमण काढताना पुनर्वसनाबाबतही विचार झाला पाहिजे. तसेच सध्या उन्हाच्या दिवसात त्यांना या जागेवरून हटविण्यात येऊ नये. पुनर्वसनाचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण करावी. असे स्पष्ट निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. महापालिकेत झालेल्या या बैठकीचा संदर्भ देऊन रेल्वेने पुन्हा एकदा नवा प्रस्ताव पाठवावा. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री यांची आपण बोलणी करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीत त्यांनी रेल्वे कंत्राटी कामगारांच्या समस्या संदर्भातील चर्चा केली. तसेच इटारसी रेल्वे पुलासंदर्भातील कामाचा आढावा घेतला. कामावरचे कंत्राटी कामगार काढताना मानवीय दृष्टिकोणातून विचार करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत भांडेवाडी येथे इसाई दफनभूमी संदर्भात जागा देण्याच्या प्रश्नावर महानगरपालिका व संबंधित विविध सामाजिक संघटनांची बैठक घेण्यात आली. अनेक संघटना यामध्ये सहभागी आहेत. त्यांनी देखील या संदर्भात मागणी केली आहे. त्यामुळे जागेवरचे आरक्षण हे दफनभूमीसाठी ठेवण्यात यावे. मात्र ही जमीन महापालिकेच्या मालकीची असेल. महानगरपालिके मार्फत दफनभूमीसाठी लीजवर देण्यात येईल, असे चर्चेअंती स्पष्ट निर्देश पालकमंत्री यांनी दिले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोमीनपुरा परिसरात मुस्लिम लायब्ररी सुरू आहे. या ठिकाणी अनेक मुले अभ्यासासाठी येतात. सर्वसामान्यांसाठी वर्तमानपत्रांचे वाचन करण्यासाठी या जागेचा उपयोग होतो. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. तसेच या लायब्ररीचा लीज कालावधी संपला आहे. मात्र ही एक ऐतिहासिक लायब्ररी आहे. या ठिकाणच्या कार्य लक्षात घेता त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासन घेईल. मात्र सोबतच ही जागा देताना आजूबाजूचे अतिक्रमण हटविण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.