नागपूर : ओमिक्रॉनचं संकट असल्यानं 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर निर्बंध आले आहेत. नागपुरात रात्री नऊ ते सकाळी सहा वाजतापर्यंत 144 म्हणजे जमावबंदीची कलम लावण्यात आली आहे, अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. लॉकडाऊनचा विचार नाही. पण, लोकांचा जीव महत्त्वाचा असल्याचं राऊत म्हणाले.
नागपुरात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सगळीकडं कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूनं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं राज्य शासनानं काही निर्बंध लावलेले आहेत. त्यानुसार 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.
नागपूर जिल्ह्यात जमावबंदीसह नव्या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 31 डिसेंबरला अत्यावश्यक सेवा वगळता रात्री नऊनंतर सगळं बंद राहणार आहेत. फार्महाऊस, हाउसिंग सोसायटींमधील कार्यक्रमांवरही बंदी राहील. हॉटेल रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेसह रात्री 9 वाजतापर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असेल. लग्न समारंभातील हॉलमध्ये 100 तर खुल्या जागेत 250 जणांची मर्यादा असणार आहे. अंत्यविधीसाठी 50 जणांची नागपूर शासनाकडून कमाल मर्यादा आहे.
सिनेमागृह, नाट्यगृह शेवटचा शो रात्री नऊपर्यंत 50 टक्के क्षमतेसह, क्रीडा स्पर्धा रात्री नऊ वाजतापर्यंत प्रेक्षकांशिवाय सुरू राहतील. व्यायामशाळा, सलून ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर, योगा सेंटर, रात्री नऊ वाजेपर्यंत 50 टक्के उपस्थितीसह असतील. आंतरजिल्हा प्रवास नियमितपणे सुरू राहील. शाळा, महाविद्यालये शासनाने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार सुरू राहतील. कोचिंग क्लासेस रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील. पण, विद्यार्थीसंख्या शंभर पेक्षा जास्त नको. धार्मिकस्थळे रात्री नऊपर्यंत सुरू राहतील. पण, संख्या शंभरपेक्षा जास्त नको. सार्वजनिक प्रवास वाहतूक सेवा सुरू असेल. पण, उभ्यानं प्रवास नको. अम्युझमेंट व वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरू राहतील. कमाल मर्यादा शंभर असेल. ग्रंथालय, अभ्यासिका रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहील. पण, शंभरपेक्षा जास्त संख्या नको, अशाप्रकारचे दिशानिर्देश शासनानं दिलेले आहेत.