नागपूर: चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार उडवला आहे. भारतातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारनेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अलर्ट केलं आहे. राज्यात पुन्हा एकदा ट्रेसिंग, टेस्टिंग आणि लसीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय विमानतळावर येणाऱ्या प्रत्येकाची टेस्टिंग करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने राज्याला काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात सध्या एकही नवीन कोरोनाचा व्हेरिएंट आढळलेला नाही. त्यामुळे राज्यातील जनतेने घाबरण्याचे कारण नाही. आरोग्य विभाग खबरदारी घेत आहे. टेस्टिंग डिपार्टमेंटला तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं तानाजी सावंत यांनी सांगितलं.
तालुका केंद्रापासून ते महानगर पालिकेतील सर्व आरोग्य यंत्रणेला खबरदारी घेण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य भरती करण्यावरही आमचा भर आहे, असंही सावंत यांनी सांगितलं.
फक्त चीनमधूनच नव्हे तर आपल्या देशात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची विमानतळावर थर्मल टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या देशातून कोणी परदेशात गेलं आणि परदेशातून आल्यावरही त्यांची टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
केंद्र सरकारने राज्य सरकारांना चीनच्या संदर्भात काही सूचना दिल्या आहेत. देशात चार रुग्ण आहेत. महाराष्ट्रातही एकही रुग्ण नाही. घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्यात रुग्ण आढळला नसला तरी आरोग्य विभागांना लसीकरण, डॉक्टर आणि औषधा संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. टेस्टिंग, ट्रेसिंग, लसीकरण या संदर्भात सूचना दिल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्रात लसीकरण मोठ्या झाले आहे. महाराष्ट्रातील लोकांची इम्युनिटी चांगली आहे, त्यामुळं घाबरण्याचे कारण नाही. मास्क घालणे बंधनकारक करायचे की नाही यासंदर्भात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नंतर निर्णय घेऊ, अशी माहितीही त्यांनी दिली.