नागपूर : विदर्भात आज पावसानं चांगलीच हजेरी लावली. नागपूर, भंडारा, गोंदिया (Gondia), गडचिरोली यासह बहुतेक सर्व जिल्ह्यात पाऊस पडला. त्यामुळं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याला (Shetkari) दिलासा मिळाला. गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 88 पैकी 10 दरवाजे आज सोडण्यात आले. या दहा दरवाज्यातून 409 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. गोदावरी ( Godavari), इंद्रावती नदी धोका पातळीच्या खाली आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या दोन-तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळेस पाऊस चांगल्या पद्धतीने हजेरी लावत आहे. 43.09 मिलिमीटर पावसाची नोंद गडचिरोली जिल्ह्यात या तीन दिवसांत झाली आहे.
नागपुरात आज दुपारपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाचा सायंकाळच्या वेळी जोर वाढवला. साधारणपणे संततधार पाऊस सुरू असल्याने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. मात्र सायंकाळच्या वेळी आलेल्या पावसाने कार्यालयातून घराकडे परतत असलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना पावसाचा सामना करावा लागला. दुपारपासून मध्यम स्वरूपाचा पण सतत येत असलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी मात्र आशादायी ठरणार आहे.
भंडाऱ्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी लावली. हा पाऊस धानाच्या नर्सरीसाठी पोषक ठरणारा आहे. जिल्ह्यात 18 हजार हेक्टरवर धानाची नर्सरी लावली गेली आहे. मात्र पावसाच्या लपंडावामुळे ऐन पोषणात धानाचे पऱ्हे उगविणार की नाही ही चिंता शेतकऱ्याना होती. मात्र सलग चार दिवसांपासून येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विशेष म्हणजे सलग 7 तारखेपर्यंत पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. दुसरीकडं उन्ह-पावसाच्या खेळामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका ही वाढला आहे. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच होती. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले होते. त्या रस्त्यांवरून वाहन काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. पाऊस दिवसभर धो – धो बरसल्याने नद्या, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.