नागपूर : गेल्या आठवड्याभरात कोरोना बाधितांची संख्या अतिशय जोमाने वाढत आहे. त्यामुळं कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्लान तयार केला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महापालिकेने कंत्राटी कर्मचार्यांना सेवेतून कमी केले होते. आता पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळं महापालिकेकडून आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी उपलब्ध मनुष्यबळही अपुरे पडत आहे. नव्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया मनपाच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यावेळी शासनाने कंत्राटी कर्मचार्यांची नियुक्ती केली. त्यावेळी कोविडची कामे त्यांच्याकडून करून घेतली. महापालिकेनेही 300 वर कंत्राटी कर्मचार्यांची नियुक्ती केली होती. दुसरी लाट ओसरताच या सर्व कर्मचार्यांना ऑगस्ट 2021 मध्ये कामावरून कमी केले. हे सर्व कर्मचारी तपासणी केंद्र, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह कोविड केअर सेंटर्समध्ये काम करायचे. या कर्मचार्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपली सेवा सुरू ठेवण्याबाबत आंदोलन केले होते. मात्र, त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले नाही. आता नव्यानं त्यांचा विचार केला जाऊ शकतो.
नवीन वर्षात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रुग्णांच्या संपर्कात येणार्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आवश्यक आहे. संक्रमण वाढण्याचा धोका ओळखण्यात आला. दोन दिवसांपूर्वी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले आहे. याकरिता झोन पातळीवर 12 पथकं तयार करण्यात आली आहेत. एका पथकात दोन कर्मचारी आहेत. एका पथकाला वीस जणांचे कॉन्टॅक्ट टेसिंग करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशाप्रकारे पथकाकडे दररोज 20 जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे.
कोरोना ट्रेसिंगसाठी कर्मचार्यांची कमतरता आहे. त्यामुळं महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्मचार्यांच्या अभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होऊ शकत नाही. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या मते कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकरिता आवश्यक कर्मचार्यांनी नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी ग्वाही डॉ. चिलकर यांनी दिली आहे.