नागपूर : कोविड आणीबाणीच्या पारिस्थितीत ऑक्सिजन प्लांट हाताळणाऱ्या प्रशिक्षित हातांची अनिवार्यता दुसऱ्या लाटेत उभ्या महाराष्ट्राने अनुभवली आहे. जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या धोक्याला लक्षात घेऊन ऑक्सिजन प्लांट हाताळणाऱ्या कौशल्य युक्त मनुष्यबळाची निर्मिती सुरू केली आहे. 60 तरुण मुले यासाठी जय्यत तयार होत आहेत.
नागपूर जिल्ह्याने पहिल्या व दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता व त्यासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ याची आवश्यकता याबाबतची आणीबाणी बघीतली आहे. त्यामुळं जिल्ह्यात अशा पद्धतीचे प्रशिक्षित मनुष्यबळ उभारणीसाठी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (मेयो) 60 मुलांचा ऑक्सिजन हाताळणीला समर्पित अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. महिन्याभराच्या प्रशिक्षणानंतर या मुलांसोबत जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रभाकर हरडे, मेयोच्या विभाग प्रमुख वैशाली शेलगावकर, प्रशिक्षण व मार्गदर्शन क्षेत्रातील जेष्ठ डॉ. रवींद्र आहेर, आर्थिक इन्फ्राटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे केंद्र संचालक प्रशांत निंभुरकर यांच्या उपस्थितीत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संभाव्य परिस्थितीसाठी मुलांनी आपला अभ्यासक्रम तातडीने पूर्ण करून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या व्यवस्थापनात सहभागी व्हावे तसेच नागपूर सारख्या वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या ठिकाणी विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील या अभ्यासक्रमानंतर मुलांना रोजगार मिळण्याची संधी असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
माहिती देताना श्री. हरडे यांनी कोविडमुळे आपल्या विद्यमान आरोग्यसेवा यंत्रणेवर अभूतपूर्व ताण आला आहे. ही परिस्थिती सावरण्यासाठी देशभरामध्ये कुशल कोविड योद्ध्यांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने एक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार हा कस्टमर क्रॅश कोर्स प्रोग्राम फोर कोविडसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना तीन प्रकल्प अंतर्गत तयार करण्यात आला आहे. विशेषत्वाने कोविड संबंधित आव्हाने लक्षात ठेवून भक्कम प्रतिसाद यंत्रणा कार्यरत करण्यासाठी विद्यमान कार्यक्रमाची योजना करण्यात आली आहे. जोखमीच्या मात्र महत्त्वाच्या या अभ्यासक्रमात निवड झाल्याबद्दल यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विविध मान्यवरांनी त्यांना संबोधित केले. या सर्व विद्यार्थ्यांना भेट वस्तू देण्यात आल्या. समाजाच्या सेवेसाठी या अभ्यासक्रमाचा उपयोग होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.