नागपूर : नाव कमलाबाई बावनकुळे. जन्म भंडारा जिल्ह्यातील आंबाडी (Ambadi in Bhandara district) इथला. वडील बिडी तयार करायचे. घरी चार भाऊ आणि तीन बहिणी. कमलाबाई सर्वात मोठी. मजुरीच्या पैशातून घर (house with wages) चालविणं तसं कठीण होतं. पण, संसाराचा गाडा तर हाकावाच लागतो. मग, परिस्थिती कशीही का असेना. अशात मोठी मुलगी म्हणून घरची सर्व जबाबदारी वडिलांनंतर कमलाबाईवर आली. लहान भावंडांना सांभाळता सांभाळता ती त्यांची दुसरी आईच झाली. बालसंगोपनाचे धडे घरीच मिळाले. त्यासाठी कुठल्या विद्यापीठात जाण्याची गरज पडली नाही. एखाद्या नर्सला लाजविले इतकं ज्ञान आजही त्यांच्यात आहे. कारण लहान तीन भाऊ आणि बहिणी यांचं संगोपन आई-वडील करत असताना आपोआपचं मोठ्यांकडून ते लहानांकडे झिरपत येत. लग्न झाल्यानंतर पती लाखनीत सायकलची दुरुस्ती ( repair of bicycle in Lakhni) करायचे. त्यामुळं इथंही काही आर्थिक परिस्थिती खूप चांगली नव्हती. दरम्यान, चार मुलं आणि तीन मुली त्यांना झाल्या. या सात मुलांचं संगोपन कमलाबाईनं केलं. त्यासाठी बरीच कसरत करावी लागली. मुलांना ताजं खायला मिळालं पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह असायचा.
घरच्या व्यक्तीला नेमकं काय हवं, याच कसब त्यांनी शिकून घेतलं. साऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. स्वतः निरक्षर असून मुलांना साक्षर केलं. सुशिक्षिताला लाजवेल, असं ज्ञान त्यांच्याकडं आहे. कुणाशी केव्हा काय आणि किती बोलावं, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यामुळंच कौटुंबिक नाती त्यांनी व्यवस्थित जपली. शेजारीपाजारी त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. मुलांची लग्न झाली. नातवडांचं संगोपन हे त्यांच्याकडं आलं. तेही त्यांनीच सांभाळलं. नातवांची तेलमालीश करण्याची जबाबदारी त्यांच्याकडंच राहायची. शिवाय भावांना मुलं झाले की, त्यांच्या संगोपनात कमलाबाईचं विशेष लक्ष असायचं. आरोग्याबद्दलही आजीबाईचा बटवा त्यांच्याकडं असतो.
लग्न असो की, कुणाचा मृत्यू. कोणत्या वेळी कोणते विधी करतात, हे त्यांना मुखपाठ आहे. भजनाची आवड जोपासली. लेखन, वाचन येत नसले, तरी बरीच भजनं पाठांतर आहेत. आता वय झालं. पंच्याहत्तरी ओलांडली. नजर कमजोर झाली. हातपाय फारसे चालत नाहीत. पण, मार्गदर्शन सुरूच असतं. कोणत्या वेळी कोणते निर्णय घ्यायचे. घरची आर्थिक परिस्थिती कशी हाताळायची. कार्यक्रम साजरे करत असताना किती उधळपट्टी करायची, किती हात आवरायचे, याचे जणू त्या प्रशिक्षणचं नव्या पिढीला देतात. नातीनला मुलगा झाला. त्यांचीही तेलमालीश कमलाबाईनीचं केली. पण, शरीर जीर्ण झालेलं कोणत्याही क्षणी अंतिम दिवस येऊ शकतो. अशी परिस्थिती असली, तरी एखाद्या विद्यापीठाएवढे ज्ञान त्यांच्याकडं नक्कीच आहे. जो व्यक्ती त्यांच्या संपर्कात आला त्याला त्याची अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही. अशा या महिलेला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.