नागपूर | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्यासाठी त्यांनी शरद पवार यांना सोबत घेऊन येण्याची भाजपने अट ठेवल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे. ही चर्चा सुरू असतानाच प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. समजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर भाजपला खूप परिणाम भोगावे लागतील. शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत आले आहेत. जेव्हा भाजपसोबत कोणीच नव्हतं तेव्हा शिंदे त्यांच्यासोबत आले. त्यांनी मोठी रिस्क घेतली. वर्षभरानंतर त्यांना डावलून अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहे. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास महायुतीत वादाची ठिणगी पडू शकते, असं सांगितलं जात आहे.
काका-पुतण्याच्या भेटीगाठीवरून संभ्रमित होण्याचं काही कारण नाही. प्रत्येक नेता आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात काही वावगं नाही. आम्हीही तेच करत असतो. शरद पवार यांच्या स्वभावाची मोजणी करणं शक्य नाही. समुद्राचा तळ मोजला जाईल, पण शरद पवार यांच्या मनात काय चाललं हे ओळखणं शक्य नाही, असं सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं.
राष्ट्रवादीचा गेम करण्यासाठी भाजपने पावलं टाकली असतील. पण शरद पवारच भाजपचा गेम करतील की काय अशी अवस्था आहे. त्यामुळे सध्या संभ्रमाचं वातावरण आहे. जे वरवर दिसतं ते तसं नाहीये. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कोणताही वाद नाही. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद आहे. तो सुसंवाद आहे. सध्या दोघांचे मार्ग वेगळे असतीलही पण भविष्यात ते एकत्र येतील, असा दावाही बच्चू कडू यांनी केला.
आजपासून दिव्यांगाच्या दारी अभियान सुरू करण्यता आळं आहे. संपूर्ण राज्यात फिरुन दिव्यांगांचे प्रश्न सोडवणार आहे. दिव्यांगासाठी एक धोरण आखणार आहोत. 16 ऑक्टोबरपर्यंत राज्यात फिरुन डिसेंबरपर्यंत धोरण तयार करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.