नागपूर : वेदांता प्रकल्प परत आला नाही, तर काँग्रेस (Congress) आंदोलन करणार, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी दिलाय. एखाद्या सरकारनं खोटं किती बोलावं, असा थेट निशाणा त्यांनी राज्य सरकारवर साधला. ते म्हणाले, वेदांता प्रकल्प (Vedanta Project) महाराष्ट्रात परत आला नाही तर काँग्रेस आंदोलन करणार आहे. वेदांता प्रकल्पासाठी काँग्रेस महाराष्ट्राभर आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिंदे – फडणवीस सरकारला हा इशारा दिला.
अतुल लोंढे म्हणाले, एखाद्या सरकारने खोटं किती बोलावं? विदर्भाच्या तरुणांवर शिंदे आणि फडणवीस यांनी अन्याय केलाय. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 15 जुलैला बैठक झाली होती. 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचा हा वेदांता प्रकल्प आहे. 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती.
अतुल लोंढे यांनी सांगितलं की, वेदांता प्रकल्पातून एक लाख लोकांना रोजगार मिळणार होता. वेदांताचे अग्रवाल यांच्यावर काही दबाव आहे का? अशी स्थिती सध्या आहे. कौशल्यधारक रोजगार महाराष्ट्रात आहे. गुजरातमध्ये सुविधा नसताना, स्कील रोजगार नसताना तिथे प्रकल्प का गेला, याचा विचार करावा लागेल.
वेदांता प्रकल्प पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला पळविल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला. असंच सुरु राहिले तर मुंबई गुजरातमध्ये संलग्नित करतील. गुवाहाटीतून सरकार मिळवून दिलं, म्हणून हे रिटन गिफ्ट आहे का? वेदांता महाराष्ट्रात गुंतवणूक करणार हा जुमला आहे, असंही ते म्हणाले.
शिंदे साहेब महाराष्ट्राशी गद्दारी कराल तर आम्ही शांत बसणार नाही. काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात परत आलाचं पाहिजे, असा पुनरुच्चार अतुल लोंढे यांनी केला.