नागपूर : आत्महत्तेपासून परावृत्त करणे. छेडछाड तक्रारीत मदत करणे. वयोवृद्धांना सहकार्य करणे हे दामिनी पथकाचं काम आहे. याशिवाय मनोरुग्ण महिलांना मदत केली जाते. जनजागृती केली जाते. दर्शन कार्यक्रमात मार्ग दाखविला जातो. अशाप्रकारे नागपुरात दामिनी पथकाने वर्षभरात 124 जणांची मदत केली आहे. मुली, महिलांना संरक्षण देण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गत हे पथक कार्यरत आहे. महिला किंवा मुलींना फोन करताच दामिनी पथक घटनास्थळी जाऊन त्यांना मदत करते. प्रसंगी दंडुका दाखवून छेडखानी करणाऱ्यांची धुलाई केली जाते.
शाळा, कॉलेज सुटल्यानंतर रोड रोमियो मुलींना टार्गेट करतात. शाळेच्या गेटसमोर उभे राहतात. अशावेळी मुख्याध्यापकांनी दामिनी पथकास कळविल्यास दामिनी पथक तिथं येते. रोड रोमियोंवर नजर ठेवते. मुलींवर वाईट नजर ठेवली, तर दंडुकांचा मार देते. पण, अनेक महिला बदनामीच्या भीतीने तक्रार देत नाहीत. गेल्या तीन वर्षांत फक्त छेडछानीच्या तीनच तक्रार दामिनी पथकाला मिळाल्या आहेत.
महिलांनी अन्यायाबाबत थेट दामिनी पथकाकडे तक्रार करावी, असे आवाहन नागपूर शहर दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक सीमा धुर्वे यांनी केले आहे. महिलांना 1091 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे. महिलांनी त्वरित मदतीचे आश्वासनी धुर्वे यांनी दिले आहे. काही महिला तक्रार करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळं छेडखानी करणाऱ्यांची हिंमत आणखी बळावते.