अयोध्या : रामलला मंदिरात विराजमान होण्याची जगभरातील रामभक्त आतुरतेनं वाट पाहतायत. सध्या अयोध्येत युद्धपातळीवर श्री रामललाचं मंदिर उभारणीचं काम सुरु आहे. कारागिर तीन शिफ्टमध्ये २४ तास मंदिर उभारणीचं काम करतायत. राजस्थानमधील बन्सी पहाडपूर येथील दगडांचा वापर करून अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचं भव्य मंदिर उभारलं जातेय. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात कोरीव दगड बसवले जात आहेत. हे दगड भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतील. सध्या दंगडांवर आकर्षक कोरीव काम युद्धपातळीवर सुरु आहे.
अयोध्येतील श्री राम मंदिर बांधकाम महत्वाची भूमिका बजावतायत महाराष्ट्रातील अविनाश संगमनेरकर. अविनाश हे गेल्या तीन वर्षांपासून अयोध्येत आहेत. श्री राम मंदिर बांधकाम ट्रस्टची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मंदिर बांधकाम एका खाजगी कंपनीला देण्यात आलंय. पण ट्रस्टच्या माध्यमातून अविनाश संगमनेरकर आणि त्यांचे सहकारी यावर लक्ष ठेऊन आहे.
श्री राम मंदिराचं काम वेगानं सुरु आहे. तळमजल्याचं काम स्लॅब लेव्हलला आलंय. परिक्रमा मार्गाचं कामंही वेगानं सुरु आहे. एकूण तीन मजल्याचे हे मंदिर असणार आहे. युद्ध पातळीवर मंदिराचं काम सुरु आहे. जानेवारी २०२४ मध्ये मंदिर दर्शनासाठी खुलं होणार, असा विश्वास अविनाश संगमनेरकर यांनी व्यक्त केलाय.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री रामललाचं दर्शन करण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर येत आहेत. ही आनंदाची बाब आहे. आम्ही त्यांना मंदिर बांधकाम कार्य दाखवू, असंही ते म्हणाले. अयोध्येतील राममंदिर निर्माणातील मराठी चेहरा अशी अविनाश संगमनेरकर यांची भूमिका आहे. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील श्री राम मंदिर भक्तांसाठी दर्शनाला खुलं होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
अयोध्या येथील राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाकाळात केले. आता बांधकाम जोरात सुरू आहे. ते केव्हा पूर्ण होणार. रामललाचं दर्शन केव्हा घेता येणार, याची प्रतीक्षा रामभक्तांना लागली आहे. हे मंदिर बांधकाम लवकर पूर्ण व्हावं, यासाठी २४ तास बांधकाम सुरू आहे.