नागपूर : नागपुरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. थंड वारा वाहत आहे. त्यामुळं तापमानात बरीच घट झाली आहे. नागपूरकरांना दिवसभर थंडीचा अनुभव घेता येत आहे. आज दिवसा २१ डिग्री सेल्सिअस तापमान होतं. रात्रीला १७ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली घसरलं. त्यामुळं थंडीत आणखी वाढ झाली. जवळपास चार अंशाने पारा घसरला आहे. नागपूरकर कडकडत्या थंडीचा काही जण आनंद घेत होते. आज दिवसभर सूर्य नागपूरकरांना दिसला नाही. दिवसाचं उणीचे कपडे घालावे लागले. संध्याकाळी काही ठिकाणी नागरिकांनी शेकोटी पेटविली होती. काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. त्यामुळं वातावरणात गारठा निर्माण झाला होता.
उद्या, गुरुवारीही थंडीची लाट कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. उद्या आकाश ढगाळलेलं राहणार आहे. काही भागात रिमझिम पावसाची शक्यता आहे.
सहा जानेवारीला काही भागात आकाश ढगाळलेलं राहील. त्यानंतर ७ ते १० जानेवारीदरम्यान आकाश स्वच्छ राहील. परंतु, तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागनं वर्तवली आहे.
सहा जानेवारीला तापमान १५ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होईल. त्यानंतर थंडीत वाढ होणार आहे. ९ आणि १० जानेवारीला तापमान ११ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागपूरकरांना थंडीचा आस्वाद घेता येणार आहे.
गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या पूर्व विदर्भातील भागात आज दिवसभर आकाश ढगाळलेलं होतं. थंडीत वाढ झाली. पुढच्या आठवड्यात आणखी थंडीत घसरण होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यानंतर सूर्यप्रकाश स्वच्छ राहणार असून, थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.