नागपूर : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा गड असलेल्या नागपुरात आजपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू झालंय. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) तीन दिवस फडणवीसांच्या गडात ठाण मांडून बसणार आहेत. पण संजय राऊत तीन दिवस काय, तीस दिवस नागपुरात राहिले तरीही फरक पडणार नाही. उलट राऊतांच्या नागपूर दौऱ्याने नागपुरात शिवसेना दोन नगरसेवकांवरून एका नगरसेवकांवर येईल, अशी टीका भाजप नेते संदीप जोशी (former mayor Sandeep Joshi) यांनी केलीय. त्यामुळेच आता संजय राऊतांच्या नागपूर दौऱ्याची जोरात चर्चा आहे. संजय राऊत यांनी नागपुरात सावजी मटण खाऊन जावं, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी खा. संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. आता नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय. संजय राऊत तीन दिवस काय, तीस दिवस नागपुरात मुक्काम करुन गेले तरीही त्याचा काहीही फरक पडणार नाही. गेले दहा वर्षे दोन नगरसेवकांपूरती मर्यादित असलेली शिवसेना राऊतांच्या नागपूर दौऱ्यानंतर एका नगरसेवकांवर येईल, असा हल्लाबोल संदीप जोशी यांनी केलाय.
शिवसेनेचे अनेक नेते नागपुरात येऊन गेले. त्याचा काहीही फायदा झाला नाही. नागपुरात दहा वर्षांत सेना दोन नगरसेवकांवर राहिलीय. त्यामुळे आता राऊतांच्या दौऱ्याने काहीही फरक पडणार नाही, असं भाजप नेते सांगतात. तर खा. संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्याने आणि शिवसंपर्क अभियानाने पक्षाला बळ मिळेल. असा विश्वास शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केलाय.
हिंदूत्त्व नेमकं खरं कुणाचं? भाजप की शिवसेना? या मुद्द्यारुन गेल्या काही दिवसांत भाजप – शिवसेनेत चांगलाच सामना रंगलाय. त्यामुळेच शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून नागपुरात खा. संजय राऊत शिवसेनेचं हिंदुत्व, जनतेपर्यंत पोहोचवणार आणि संघटन मजबूत करणार, असं शिवसेना खा. कृपाल तुमाने यांनी सांगितलंय. त्यामुळे फडणवीसांच्या गडात खा. संजय राऊत यांचा नागपूर दौरा हिंदूत्वाच्या मुद्द्यांवर गाजणार, यात शंका नाही. नागपूर महानगरपाविकेत 141 नगरसेवकांपैकी गेले. दहा वर्षे शिवसेनेचे अवघे दोन नगरसेवक आहे. आता खा. संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्याने शिवसेनेत खरंच उभारी घेणार? आणि जे दहा वर्षांत झालं नाही, तो चमत्कार आता होणार का? हे येणारा काळचं ठरवेल.