नागपूर : राज्यात वन्यप्राण्यांचं अस्तित्व असलेल्या जंगलात काही शिकारी होत असतात. गेल्या आठवड्याभरात दोन बिबटे लोखंडी फासात अडकले. त्यामुळं जंगलात बहेलिया शिकाऱ्यांच्या (Hunters) टोळीने शिरकाव केला का ? याचा तपास करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (Chief Conservator of Forests) सुनील लिमये यांनी दिलेत. मध्य प्रदेशातील बहेलिया, बावरीया टोळीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने (National Tiger Authority) दिलेत. राज्यात गेल्या आठ दिवसांत वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या दोन घटना घडल्या. या घटनांमध्ये बहेलिया वापरत असलेल्या विशिष्ट पद्धतीचा शिकारीचा सापळा सापडला. राज्याच्या वनखात्यासमोर या शिकाऱ्यांनी ताकदीने नवे आव्हान उभे केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही वर्षांपूर्वी बहेलिया शिकाऱ्यांनी राज्यात वाघाच्या अनेक शिकारी केल्या. या शिकारींमध्ये बहेलिया स्वत: उतरले होते. विदर्भात अनेक ठिकाणी त्यांनी वेश बदलून, नावं बदलून तळ ठोकले होते. ज्याचा ठावठिकाणा राज्याला लागला नाही. ज्यावेळी वनखात्याला कळले, तेव्हा अनेक वाघ त्यांनी मारले होते. त्यामुळं वनविभाग आता सक्रिय झालंय.
चंद्रपूर तालुक्यातील तोरगाव (मोर्शी) येथे रंगनाथ माथेरे याच्याकडून बिबट्याच्या २१ नगर मिशा, तेरा नखे, बारा दात नऊ फेब्रुवारी रोजी सापडलेत. ही कारवाई नागपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक सुरेंद्र वाढई, उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात यशवंत नागुलवार, साकेत शेंडे, लहू ठोकळ, कोमल जाधव, नीलेश तवले, सुधीर कुलरकर, विनोद शेंडे, गणेश जाधव, दीनेश पडवळ तसेच भंडारा वनविभाग पवनीच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी केली.
दुसऱ्या घटनेत, रामटेक तालुक्यातील पंचाळा येथे बिबट्या मृतावस्थेत सापडला. नंदू शिवरकर याने पिकाच्या संरक्षणाकरिता विद्युत करंट लावला होता. विजेच्या प्रवाहात बिबट्या अडकल्यानं बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना चार फेब्रुवारी रोजी घडली. ही कारवाई नागपूर वनवृत्ताचे एन. जी. चांदेवार यांच्या मार्गदर्शनात रितेश भोंगाडे, बी. एन. गोमासे, के. व्ही. बेलकर, एस. एन. केरवा, व्ही. वाय, उगले व डी. एम. जाधव यांनी केली.