नागपूर : दिवसेंदिवस मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत तज्ज्ञ व्यक्ती शोधूनही सापडत नाहीत. यावर उपाय म्हणून राज्यात सेंटर फॉर एक्सलेंस स्थापन करण्यात आले होते. नागपूर, ठाणे आणि पुणे येथे मानसिक आरोग्याशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय 2019 मध्ये मंत्रिमंडळाने घेतला. यानुसार, नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात (Regional Psychiatric Hospital) सायकॅट्रिक सोशल वर्कर (psychiatric social workers ) या विषयातील एमफीलच्या चार जागांना मंजुरी देण्यात आली होती. यात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय तसेच प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्याचे ठरले होते. यानुसार, एमडी सायकॅट्रिकच्या चार जागांनाही मंजुरी देण्याचे ठरले होते.
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात एमडी सायकॅट्रिक आणि सायकॅट्रिक सोशल वर्कर हे दोन्ही अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नाशिकच्या पथकाने याठिकाणी पाहणी केली. मूलभूत सुविधा असल्यानं समाधान व्यक्त केलं. आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या पथकाकडून पाहणी होईल. त्यानंतर हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. मनोरुग्णांकडे बहिस्कृत भावनेने पाहिले जाते. घरचे लोकं त्यांना पाहिजे तसा रिस्पान्स देत नाहीत. अशावेळी मनोरुग्णालय हेच त्यांच्यासाठी जगण्याचे साधन ठरते. बरे झाल्यानंतर त्यांना सामान्य आयुष्य जगता येते. त्यामुळं अशाप्रकारचे तज्ज्ञ तयार करणे आवश्यक आहे. त्याशिवाय समाजातील मानसिक आजार कमी होणार नाहीत.
व्यसनाधीनता, परीक्षेतील अपयश, कौटुंबिक कलह, प्रेमभंग, नैराश्य, कर्जबाजारीपणा यामुळं मानसिक रुग्ण वाढतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळं मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर उपाय म्हणून तज्ज्ञ तयार करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोणातून वरील दोन्ही अभ्यासक्रम उपयोगी ठरतील. एमफील सुरू करण्यासाठी शासनाकडून 34 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून व्हीसी हॉल, क्लास रूम व लायब्ररी तयार होईल. या बांधकामाला प्रशासकीय मंजुरीची गरज असल्याचं प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितलं.