नागपूर : परदेशातून प्रवासी नागपुरात आल्यास प्रशासनाला कळवा, असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलंय. जिनोम सिक्वेंसिंगची तपासणी करण्यासाठी नमुने पुणे तसेच हैद्राबादच्या प्रयोगशाळेत पाठविले जातात. परंतु, अद्याप एकही ओमिक्रानचा रुग्ण आढळून आला नसल्याचं मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कळविलंय.
कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सीरो सर्व्हेचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. यात शहरातील 84 टक्के तर ग्रामीण भागातील 75.92 टक्के लोकांमध्ये अॅन्टिबॉडी तयार झाल्याचं पुढे आलंय. शहर आणि ग्रामीण भागात मिळून सुमारे 80 टक्के लोकांमध्ये अॅन्टिबॉडी तयार झाल्या आहेत. शहरातील दहा झोनमध्ये धंतोली झोनमध्ये सर्वाधिक प्रमाण आहे. ग्रामीण भागातील पारशिवनी तालुका सर्वाधिक प्रभावित झाल्याचे पुढे आलंय.
जिल्ह्यातील 6 हजार 100 जणांचे नमुने घेतले होते. तिसर्या सर्वेक्षणात महापालिका हद्दीतील 10 झोनमधील प्रत्येकी 4 वॉर्डातील एकूण 3 हजार 100 तर ग्रामीणच्या 13 तहसीलमधून प्रत्येकी 1 मुख्यालय व प्रत्येक तहसीलमधील दोन गावातून एकूण 3 हजार नमुने गोळा केले. यासाठी 6 ते 12, 12 ते 18, 18 ते 60 आणि 60 हून अधिक अशा वयोगटाचे चार गट तयार करण्यात आले होते. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. संजय जोडपे यांच्या मार्गदर्शनात मेडिकलमध्ये पीएसएम विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार यांच्या नेतृत्वात ही तपासणी करण्यात आली.
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी एकूण १९ बाधितांची भर पडली. यात शहरातील १६, ग्रामीण भागातील २ तर जिल्ह्याबाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदाच १९ रुग्णांची नोंद झाली. यात शिवाजीनगरातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा समावेश आहे. कोरोनाचे दुहेरी सावट असताना नागरिकांमध्ये सतर्कता दिसून येत नाही. शहरातील बाजारपेठा, लग्न समारंभ, विविध कार्यक्रमांमध्ये नागरिक विनामास्क मुक्तसंचार करत आहेत. सोशल डिस्टन्सिंग कुठेही पाळताना दिसून येत नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असंही मनपा प्रशासनाच्या वतीनं कळविण्यात आलंय. जिल्ह्यात दिवसभरात २ हजार ९४१ चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी मंगळवारी १९ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आढळून आले. तर दिवसभरात जिल्हय़ातून केवळ २ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले.