नागपूर : जन्मताच बहिरेपण तपासणारी यंत्रणा ग्रामीण भागात योग्य प्रकारे वापरा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर (Yogesh Kumbhejkar) यांनी केले. नागपूर झेडपी सीईओंकडून ग्रामीण आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. जन्मताच बहिरेपण तपासून पुढील उपचाराची दिशा निर्देश करणाऱ्या ‘ओएई’ यंत्रणेचा योग्य वापर करा. तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला ‘बूस्टर डोस’ (Booster Dose) दिला जाईल. याची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी येथे दिले. योगेश कुंभेजकर यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) डॉ. दीपक सेलोकार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी व अन्य आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.
यावेळी त्यांनी तीन गोष्टींची प्रामुख्याने पाहणी केली. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्या यासाठी टेलीमेडिसीन, यंत्रणेचा वापर केला जात आहे. नागपूरमधील एम्स या ठिकाणावरून दृकसाव्य माध्यमांद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत दिला जात आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये नवजात बालकाची श्रवणशक्ती तपासण्याची सुविधा ओएई मशीनद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा लाभ नवजात बालकांच्या पालकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनातील रुग्ण दररोज वाढत आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. पहिला दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांनी आता बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कामठी, गोमटी, पाटणसावंगी, सावनेर, कळमेश्वर, गोंडखैरी या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपविभागीय आरोग्य केंद्रात कुंभेजकर व आरोग्य चमूने भेटी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी केली. आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेतला.