नागपूर : मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडीनं बहुमत (majority) सिद्ध करावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यपालांनी (Governor) ती मान्य केली. राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे उद्या विश्वासदर्शक ठराव असणार आहे. महाविकास आघाडीचे बहुमत सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईला बोलावले. विदर्भातील भाजपचे सर्व आमदार मुंबईकडे जायला सुरवात झाली. भाजपचे नागपुरातील आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopade) मुंबईकडे रवाना झालेत. आज सायंकाळपर्यंत सगळेच आमदार आपल्या सोयीनुसार मुंबईला जाणार आहेत. सरकारवर शिवसेनेचेच नाही तर सगळेच आमदार नाराज असल्याची प्रतिक्रिया कृष्णा खोपडे यांनी दिली. सरकार बनविण्याबद्दल पक्ष नेतृत्व ठरविणार असल्याचं यावेळी खोपडे म्हणाले.
खोपडे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना आज सायंकाळपर्यंत मुंबईत बोलावण्यात आलंय. तिथं पोहचल्यानंतर ज्या काही सूचना मिळतील त्यांचे आम्ही पालन करणार आहोत. विद्यमान राजकीय परिस्थिती ही अंतिम टप्प्यात पोहचली आहे. नवीन सरकार येईल. राज्य सरकारविरोधात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अडीच वर्षात या सरकारकडून बऱ्याच चुका झाल्या. आमदारांच्या मतदारसंघात विकासकामं झाली नाहीत. पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. नवीन सरकारबद्दल नेतृत्व ठरवेल, असंही खोपडे म्हणाले.
विदर्भातील आजी-माजी आमदार, खासदार, पदाधिकारी यांची काल बैठक नागपूरच्या अशोका हॉटेलमध्ये झाली. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता संघटन आणि बूथ मजबुती या दृष्टिकोनातून या बैठकीचा आयोजन करण्यात आलं. भाजपचे विदर्भातील वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, खासदार अनिल बोंडे यांनी या बैठकीचं नेतृत्व केलं. संघटन मजबूत कसं होईल आणि जनतेपर्यंत पोहोचवून जनतेला भाजपकडे वळविण्याच्या दृष्टिकोनातून मंथन या बैठकीत करण्यात आलं.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारला गुरुवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना केल्यात. शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर सुनावणी झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. त्यामुळं भाजपनं आजच सर्व आमदारांना मुंबईला येण्याच्या सूचना केल्या आहेत.